पुणे : संत्र्याची बर्फी, तर्री पोहे, गोळा भात असे पदार्थ आठवले की डोळ्यासमोर येते ते नागपूर. गोडगुलाबी थंडीने आणि तितक्याच तापलेल्या मातीने उन्हाळाही सहन करणाऱ्या नागपुरी पदार्थांची खास तिखट, मसालेदार आणि तरीही चवदार अशी परंपरा आहे. याच परंपरेमधील एक पदार्थ म्हणजे वडाभात. चला तर बघूया या वडाभाताची कृती.
साहित्य :
- ३ वाट्या तांदूळ
- १ वाटी मोड आलेली मटकी
- २ वाट्या हरबऱ्याची डाळ,
- १ वाटी तुरीची डाळ,
- १वाटी उडदाची डाळ
- मिरच्या,
- थोडे लाल तिखट,
- धने-जिरे पूड,
- लसूण,
- कोथिंबिर,
- कढीपत्ता,
- मीठ,
- तेल.
भात : दोन चमचे तेल तापवून त्यात तीन वाट्या स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकून परतून घ्या.
तांदूळ परतल्यावर त्यात साडेपाच वाट्या उकळते पाणी, मीठ टाकून मोकळा भात शिजवून घ्या.
वड्यासाठी :
दिलेल्या सर्व डाळी, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, कोथिंबीर, लसणाचे तुकडे, मीठ आणि धणेजिरे पूड, मीठ एकत्र करून मिक्सरवर वाटून घ्या.
या डाळी अगदी बारीक न वाटता दातात येतील अशा पद्धतीने थोड्या जाडसर वाटून घ्या.
मीठ कमी घाला आणि भातात घातले आहे.
वाटताना गरज पडल्यास अगदी थोडे पाणी घाला.
आता कडकडीत तेल तापवून त्यात वडे थापून तळून घ्या.
फोडणी : तेल तापवून त्यात मोहरी तडतडून घ्या. तेल जरा थंड झाल्यावर त्यात हिंग, कढीपत्ता आणि हळद घालून गॅस बंद करा.
खाताना पानात भात घेऊन त्यावर चार ते पाच वडे कुस्कुरून घाला. त्यावर तेल घेऊन एकत्र करून खा.
(या भातासोबत कढी किंवा ताक घेण्याची पद्धत आहे.)