महागाई, गरज आणि काटकसर या तीन गोष्टींतून उत्तम ट्रेण्डसेटर पदार्थ जन्माला येतात. अमेरिकेत लोकप्रिय असलेलं गार्बेज सॅलड हा असाच एक पदार्थ. आजच्या घडीला अमेरिकेतच नाहीतर जगभर गार्बेज सॅलडचे विविध प्रकार मिळतात. लोक आवडीने खातात. खाण्याच्या पदार्थाशी ‘गार्बेज’ अर्थात कचरा हा शब्द का जोडला गेला असेल अशी शंकाही अनेकांच्या मनात येत नसावी. पण उत्सुकता म्हणून शोधलं तर या नावाच्या पोटात फार रंजक खाद्यकहाणी सापडते.
साधारण १९१८ ची गोष्ट. न्यूयॉर्कच्या राँचेस्टर येथील अलेक्झांडर तहाऊ या हॉटेलचालकाने जेवणासाठी म्हणून वन प्लेट मिल तयार करायचं ठरवलं. बर्गरच्या लादीमध्ये बटाटे, भाज्या, मांस, पॅटीस, बिन्स आणि जे काय उरलंसुरलं होतं ते मसाले घालून भरलं. त्यातून तयार झालं हे गार्बेज सॅण्डविच. राँचेस्टर युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांना ते भारी आवडलं. खायला सुटसुटीत, पोटभरीचं आणि किंमत माफक. तहाऊच्या मुलानं निकनं जेव्हा हे हॉटेल चालवायला सुरुवात केली तेव्हा त्यानं वडिलांनी बनवलेल्या पदार्थाला गार्बेज सॅण्डविच असं नाव दिलं.
मात्र, “व्हॉट्स कुकिंग अमेरिका?”- यांनी प्रसिद्ध केलेल्या लेखानुसार या बर्गरचं श्रेय काही राँचेस्टरच्या त्या हॉटेलला मिळालं नाही. १९८० मध्ये जेन आणि जॉर्जेटी यांनी एक बर्गर बनवलं आणि ते भारी लोकप्रिय व्हायला लागलं. शिकागो ट्रिब्यूनने प्रसिद्ध केलेल्या लेखानुसार चीज, लेट्यूस, टमाटे, बिन्स, ऑलिव्ह असं बरंच काही घातलेलं गार्बेज सॅण्डविच जेन-जॉर्जेटीनं रांधलं.
पण, मग तरी त्या पदार्थाचंही नाव गार्बेज सॅण्डविच का? - तर उरल्यासुरल्या भाज्या, वेगवेगळे पदार्थ कदाचित टाकायचे म्हणून बाजूला काढले तरच असे एकत्र येऊ शकतात असं ट्रिब्यूनमध्ये लेख लिहिणाऱ्याला वाटलं. मात्र, पदार्थ म्हणून त्याची चव अप्रतिम आणि पोटभरीचं, पौष्टिक आणि स्वस्त हे तीन गुण तर त्यात होतेच. वाढत्या महागाईच्या दिवसात अनेकांचं पोट या गार्बेज सॅलडने भरलं. हळूहळू सर्वत्रच स्ट्रीट फूड, फास्ट फूड म्हणून लोकप्रिय झालं.
अर्थात, अशी वाट्टेल ती फळं, भाज्या एकत्र करून कच्चंच खाणं पोटासाठी कितपत बरं? गार्बेज सॅलड शिळं खाल्लं तर काय? प्रश्न अनेक. मात्र ज्या पदार्थाची सुरुवातच महागाईचे चटके बसू लागले म्हणून झाली तो पदार्थ चव आणि पोटभरीचं यात मात्र कमी पडत नाही.