- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार(bhalwankarb@gmail.com) कॉफीत कॉफी किती आणि चिकोरी किती, याचे प्रमाण कॉफी उत्पादकांनी स्पष्ट केले पाहिजे, ही बातमी वाचली आणि गंमत वाटली. फिल्टर कॉफी आणि चिकोरीचे नाते अगदी जुने आहे. गेल्या दोनशे वर्षांपूर्वीपासून कॉफीत चिकोरी मिसळून विकली जाते. मी चिकोरी हे नाव ऐकले ते लहानपणी. आजी दुपारी चहा घेत नसे. दुधात कॉफी उकळून ती घेई. स्वराज्यासाठी प्रत्येकाने काही तरी त्याग केला पाहिजे, असं गांधीजींनी एका सभेत सांगितलं. त्या सभेला ती गेली होती. त्यानंतर तिने तिचा आवडता चहा सोडला. पुढची पन्नासेक वर्षं ती चहा प्यायली नाही, पुढे पंचाहत्तरीनंतर पुन्हा चहा सुरू केला. त्यापूर्वी तिच्या कॉफीच्या पाकिटावर चिकोरीयुक्त कॉफी असं लिहिलेलं असायचं... आज चाळिशीत असलेल्यांच्या आयुष्यात कॉफीचा प्रवेश झाला, तोच मुळी चिकोरीयुक्त कॉफीतून.
पुढे स्टारबक्स, कॅफे कॉफी डेसारख्या ठिकाणी कॉफीचे अड्डे सुरू झाले, कॉफीच्या कपाचा आकार दुपटीने वाढला. काळ्याभोर कॉफीचा भलामोठा पेला हातात घेऊन ऑफिसला जाणारे लोक दिसू लागले तर कॉफीशॉप्समध्ये दुधाळ आणि आइसक्रिम घातलेली कॉफी पिणारी तरुणाई, एस्प्रेसोचा छोटा कप हातात घेऊन शांतपणे काम करणारे लोकही तिथेच कुठेतरी कोपऱ्यात बसू लागले. बहुतेक ब्रॅण्डेड कॉफीमध्ये चिकोरी मिश्रित कॉफी वापरत नाहीत. तरी चिकोरी मिसळलेल्या कॉफीची लोकप्रियता कमी झाली नाही. कारण चिकोरी आणि कॉफीच्या चवीत असलेले साम्य.
चिकोरी एक प्रकारचे मूळ असते. त्याला वाळवून, भाजून त्याची पूड कॉफीत मिसळली जाते. त्या दोन्ही चवी अगदी एकमेकांना पूरक असतात. कॉफी मुळात अतिशय कडवट असते, तिच्या कडू चवीला चिकोरी थोडे सौम्य करते. कॉफी रंगाने गडद असते, चिकोरी मात्र हलक्या चॉकलेटी रंगाची! दाक्षिणात्य फिल्टर कॉफीला चिकोरी अजून दुधाळ बनवते. चिकोरीमध्ये कॅफेन अजिबात नसते. म्हणजे कॉफीत चिकोरी मिसळली की तिच्यातले कॅफेनचे प्रमाण आपोआप कमी होते. कॉफीच्या काही चाहत्यांना हे नको असते. कॉफीतल्या कॅफेनमुळे शरीराला तरतरी येते, तिच्याशी तडजोड का करायची, असे त्यांना वाटते, म्हणून कॉफीत चिकोरी नाही ना, याची खात्री करून कॉफी पिणारे कमी नाहीत. असे असले तरी चिकोरीचे चिक्कार फायदे आहेत, ते पुढच्या भागात.