- साधना तिप्पनाकजे(खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक)हरयाणा म्हटलं की, उंच धिप्पाड शरीरयष्टी आणि बोलण्यात आक्रमकता असणारे लोक डोळ्यांसमोर येतात. उत्तर-दक्षिणेतल्या काही प्रांतांएवढी हरयाणातल्या खाद्यसंस्कृतीबद्दल चर्चा फारशी ऐकायला मिळत नाही. यमुना आणि घग्गर या मुख्य नद्यांसोबत अनेक नद्यांची सुपीक खोरी असणारा हा पठारी भाग. शिवालिकच्या पायथ्याशी असणारा काय तो थोडा पहाडी प्रदेश. पठारी सुपीक खोऱ्यात गव्हाचे वर्चस्व मोठ्या प्रमाणावर आहे. इथल्या पारंपरिक आहारात वेगवेगळ्या रोट्याच असतात. पूर्वी रोजच्या जेवणाकरिता गहू आणि काळे चणे यांच्या मिश्रणापासून ‘गोचिनी आटा’ तयार केला जायचा. गोचिनी रोटी इथं खूप पौष्टिक मानली जाते; पण हळूहळू काळे चणे आट्यातून गायब होत गव्हाचीच रोटी केली जाऊ लागली. तरी बेसन किंवा चण्याचे पीठ नावापुरते का होईना कणकेत घालून, काही विशेष रोट्या केल्या जातात. थंडीत बाजरीची रोटी किंवा बाजरीची खिचडी इथं आहारात असतेच. कणकेत कधी बार्लीचं पीठ मिसळूनही रोटी करतात. पारंपरिक हरयाणवी रोटीचा प्रकार म्हणजे गव्हाच्या जाडसर दळलेल्या पिठापासून तयार केलेले अंगे किंवा अंगरके किंवा टिकड्डा गावांमध्ये खाल्ला जातो.
या टिकड्डाच्या पिठात बेसन, हळद, मीठ, मिरची पूड, ओवा, तूप आणि खायचा सोडा घालतात. हाताने साधारण अर्धा इंच जाडसर थापलेल्या टिकड्डांना काट्याने भोक करतात. जेणेकरून ते आतपर्यंत शेकले जावेत. मग हे टिकड्डा शेणी किंवा चुलीतल्या निखाऱ्यांवर भाजतात. खुसखुशीत टिकड्डा खाण्यापूर्वी त्याचा वरचा पापुद्रा उचकटतात आणि त्यात भरपूर लोणी किंवा तूप रोटीत जिरवतात. याच्या सोबत असते कोथिंबीर, पुदिना आणि टोमॅटोची चटणी.
इथल्या आहारात जवाचाही वापर होतो. जवाचा जाड रवा आणि घाटपासून राबडी तयार करतात. या घाटमध्ये बेसन, जाडसर कणीक, मीठ आणि ताक असतं. काही जण घाट न घालताही राबडी तयार करतात. ही राबडी तपेल्यासारख्या भांड्यात शिजवतात. उन्हाळ्यात ही राबडी बऱ्याचदा केली जाते. मुऱ्हा म्हैस आणि हरयाणा गाय हे पशुधन दुधाकरिता खूप प्रसिद्ध आहे. साहजिकच इथल्या आहारात पेलाभर लस्सी किंवा ताक रोजच्या जेवणात असतंच.(sadhanasudhakart@gmail.com)