गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनाला येणारे भाविक बाप्पापुढे मोदक किंवा फळांचा नैवेद्य दाखवतात. मोदक किंवा ताजी फळं हातोहात प्रसाद म्हणून वाटली जातात, मात्र प्रश्न येतो मोठ्या प्रमाणात उरलेल्या आणि पिकलेल्या केळ्यांचा! ती जास्त दिवस ठेवून चालत नाही, एक तर त्याला पाणी सुटते, आंबट वास येतो नाहीतर बुरशी येऊन कीड पडते. अन्नाची अशी नासाडी पाहवत नाही आणि ती कोणाला देणेही योग्य वाटत नाही. अशा वेळी उपाय म्हणून पुढील रेसेपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. एवढ्या केळ्यांपासून बनलेल्या पदार्थाचे प्रमाणही भरपूरच असणार, मात्र या रेसेपी इतक्या टेस्टी होतात की त्या बनवून तुम्ही शेजारी पाजारी वाटल्या तर तेही पदार्थाचा आस्वाद घेतील. काहीतरी छान खिलवल्याचा आनंद तर तुम्हाला मिळेलच, शिवाय अन्न वाया गेले नाही याचे समाधानही मिळेल. चला तर शिकूया तीन सोप्या रेसेपी.
केळ्याचे अप्पे
साहित्य : एक वाटी जाड पोहे (कांदा पोहयाचे), बारीक रवा दोन वाट्या बारीक रवा , एक वाटी दूध , अर्धी वाटी खवलेला ओल्या नारळाचा चव , तीन पिकलेली केळी , एक वाटी किसलेला गूळ , अर्धा चमचा वेलची पूड,अर्धा चमचा कायचा सोडा (किंवा इनोजही चालेल) , अर्धे लिंबू व आप्पे घालण्यासाठी थोडे साजूक तूप.
कृती : पोहे,दूध , रवा , ओल्या नारळाचा चव,गूळ ,केळी,वेलची पूड हे सर्व मिक्सरमध्ये घेऊन त्यात सोडा घालून व लिंबू पिळून मग दोन मिनिटे मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे व एका बाउलमध्ये काढून पांच मिनिटे झाकून ठेवावे. नंतर निर्लेपचे आप्पे पात्र गॅसवर ठेऊन साजूक तूप घालून हे मिश्रण घालून ५ मिनिटे झाकून लगेच काढावे. डिशमधून गोड घट्ट दहयाबरोबर हे गोड आप्पे सर्व्ह करावेत.
केळ्याचे मिल्कशेक
केळ्याची शिकरण आपण करतोच, त्यालाच थोडेसे ट्विस्ट देऊन करता येते बनाना मिल्क शेक अर्थात केळ्याचे मिल्कशेक. दूध आणि केळी दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. एकट्या दुधाची चव आवडत नसेल तर त्यात केळी घालून मिल्कशेक तयार करा. हवे असल्यास त्यात चिमूटभर दालचिनी पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाका
साहित्य : केळी, दूध, मध, वेलची पूड, ड्राय फ्रुट्स
कृती : केळी सोलून मिक्सर पॉट मध्ये टाकावीत, त्यात गरजेनुसार थंड दूध घालावे. पिकलेली केळी मुळातच गोड असल्याने त्यात साखर न घालता चवीसाठी मध घालावा. वेलची पूड घातल्याने मिल्कशेकची चव वाढते. मिक्सर मधून हा मिल्क शेक फिरवून घेतल्यावर सर्व्ह करताना त्यात काजूचे तुकडे घालावेत आणि बदामाची पूड घालावी.
केळ्याचे पॅन केक :
साहित्य - एक कप मैदा अगर कणिक, एक चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, तीन चमचे पिठीसाखर, तीन चमचे पातळ केलेलं बटर (लोणी अगर तूप पण चालेल), दूध
कृती : सगळ्यात आधी एका मध्यम आकाराच्या भांड्यामध्ये एक कप मैदा अथवा कणिक मोजून घ्यावे. मग त्यामध्ये अनुक्रमे पिठीसाखर -बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा इत्यादी घालून नीट मिक्स करून घ्यावे. आता मेल्टेड बटर घालावे.. मिश्रणामध्ये थोडे थोडे करून दूध घालून मिश्रण इडलीच्या पिठा इतके पातळ होऊ द्यावे (जास्त पातळ नको)... आता हे मिश्रण फक्त पाच मिनिट मिनिटासाठी झाकून ठेवावे यानंतर (बारीक आचेवर)नॉनस्टीक तव्या वरती थोडेसे बटर टाकून पळी नी थोडेसे मिश्रण टाकावे व हलकेच पसरू द्यावे(फुलक्या एवढे).. साधारण अर्ध्या मिनिटानंतर पॅन केक उलटून दुसऱ्या बाजूनेही सोनेरी सर भाजून घ्यावा.(मिश्रण जास्त वेळ ठेवू नये)... हे गरम गरम पॅन केक मध, चॉकलेट सिरप ,कॅरॅमल सिरप ,स्ट्रॉबेरी अगर इतर कुठल्याही फळा पासून बनवलेला सॉस इत्यादी बरोबर सर्व करावेत.