संपूर्ण देशभरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाचे घराघरांमध्ये आगमन झाले आहे. अशातच आपल्या लाडक्या बाप्पाला त्याच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यासाठी गोडाच्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे. अनेकदा कामाची धावपळ आणि नैवेद्य तयार करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे हे पदार्थ बाजारातून विकत आणले जातात. पण जर हेच पदार्थ तुम्ही तुमच्या हातांनी तयार केले तर त्याचं महत्त्व आणखी वाढतं. अशातच बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखविण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये मोतीचूरच्या लाडूचा आवर्जुन समावेश करण्यात येतो. जाणून घेऊयात मोतीचूरचे लाडू तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- बेसन 60 ग्रॅम
- केसर
- साखर अर्धा कप
- दूध 2 चमचे
- तेल किंवा तूप आवश्यकतेनुसार
- पिस्ता किंवा बदामाचे तुकडे
कृती :
- अर्धा कप बेसन आणि पाणी एका बाउलमध्ये घेऊन एक पेस्ट तयार करा. लक्षात ठेवा त्यामध्ये गुठळ्या ठेवू नका. त्यासाठी हे मिश्रण एका चाळणीने चाळून दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्या.
- एका पॅनमध्ये साखर आणि पाणी टाकून त्याचा पाक तयार करण्यासाठी ठेवा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर त्यामध्ये थोडं दूध टाकून थोडा वेळ शिजवून घ्या. त्यानंतर पाक तयार करा.
- एका कढईमध्ये आवश्यकतेनुसार, तेल किंवा तूप मध्यम आचेवर गरम करा. बेसनापासून तयार केलेल्या मिश्रणामध्ये छोट्या-छोट्या छिद्रांचा झारा बुडवा आणि कढईवर नेऊन हलकेच झटका द्या. जेणेकरून बेसनाचे छोटे छोटे थेंब कढईमध्ये पडतील. दुसऱ्या झाऱ्याने कढईतील बुंदी एकत्र करा आणि पाकामध्ये टाका.
- बेसनाच्या संपूर्ण मिश्रणाची बुंदी तयार करून घ्या. तयार बुंदी पाकामध्ये एक तासापर्यंत मुरण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाकामधून काढून लाडू वळून घ्या.
- मोतीचूरच्या लाडूंचा नैवेद्य बाप्पसाठी तयार आहे.