Ganesh Chaturthi 2019 : एखादं नवीन काम सुरू करण्याआधी श्रीगणेशाची पूजा करण्यात येते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला मोदक फार आवडतात. अशातच बाप्पा घरी आला की त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी घराघरांमध्ये मोदक केले जातात. पण अनेकजण बाजारातून मोदक विकत आणले जातात. सणासुदीच्या काळात बाजारामध्ये अनेकदा भेसळयुक्त पदार्थही मिळतात असं आपण अनेकदा ऐकतो. अशावेळी बाप्पाचा नैवेद्य घरीच तयार केला तर भेसयुक्त पदार्थांपासून आपण दूर राहू शकतो.
अनेकदा घरी नैवेद्यासाठी उकडीचे मोदक तयार करण्यात येतात. पण बाप्पाला दररोज उकडीच्या मोदकांचाच नैवेद्य दाखवण्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करून त्यांचा नैवेद्य दाखवू शकता. जाणून घेऊया बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास मोदकांचे प्रकार..
1. पारंपरिक उकडीचे मोदक
तांदळाच्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या या मोदकांमध्ये खोबरं आणि गूळाचं सारण भरण्यात येतं. त्यानंतर हाताने किंवा साच्यामध्ये टाकून तुम्ही याला मोदकाचा आकार देऊ शकता. त्यानंतर हे मोदक वाफवून घ्यावे. खाण्यासाठी चविष्ट असे उकडीचे मोदक तयार आहेत.
2. फ्राय मोदक
पारंपारिक मोदकांपेक्षा हटके स्टाइलने मोदक तयार करायचे असतील तर तुम्ही फ्राइड मोदक तयार करू शकता. यासाठी तांदळाचं पिठ आणि गुळ, खोबऱ्यासोबत मोदक तयार करून त्याला तेल किंवा तूपामध्ये तळून घ्यावे.
3. चॉकलेट मोदक
चॉकलेट म्हटलं की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. बाप्पासाठीही तुम्ही चॉकलेटचे मोदक तयार करू शकता. हे मोदक कंडेन्स मिल्क आणि कोको पावडरपासून तयार करण्यात येतात.
4. मोदक पेढा
केसर पेढा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोदक पेढाही तयार करू शकता. त्यासाठी तुम्ही आधी घरच्या घरी केसरचा पेढा तयार करून घ्या. नंतर मोदकाच्या साच्याचा वापर करून त्याला मोदकाचा आकार देऊ शकता.
5. चॉकलेट आणि खोबऱ्याचे मोदक
चॉकलेट आणि नारळापासून तयार करण्यात आलेला मोदक फर कमी वेळात तयार होणारा पदार्थ आहे. खोबरं आणि साखरेच्या सारणाचा मोदक तयार करू शकता.