मोदक म्हटलं की, बापाचा प्रिय पदार्थ, हे आपल्या सर्वांना माहित आहे. गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरू असून बाप्पाच्या आदरातिथ्यासाठी घराघरात गोडाच्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे. तुम्हालाही आज बाप्पाच्या प्रसादासाठी काय करू हा प्रश्न पडला आहे का? टेन्शन नका घेऊ. आज आम्ही तुम्हाला एक हटके आणि कमी वेळात होणारी रेसिपी सांगणार आहोत.
उकडीचे मोदक, माव्याचे मोदक असे वेगवेगळे मोदक तुम्ही ट्राय करून पाहिले असतीलच. पण तुम्ही कधी पनीर मोदक ट्राय केले आहेत का? हो... बरोबर ऐकलतं.. पनीर मोदक. आज आम्ही तुम्हाला पनीर मोदक तयार करण्याची सहज सोपी रेसिपी सांगणार आहोत.
पनीर मोदक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- 2 वाट्या किसलेलं पनीर
- 1 वाटी कंडेन्स मिल्क
- वेलची पूड
- केशर
- तूप
पनीर मोदक तयार करण्याची कृती :
- एक पॅन मध्यम आचेवर ठेवून त्यामध्ये पनीर कुस्करून त्यामध्ये परतून घ्या.
- पनीर परतल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर एकत्र करा.
- तयार मिश्रणात कंडेन्स मिल्क एकत्र करा.
- मिश्रण एकजीव करून त्याचा गोळा होइपर्यंत सतत ढवळत राहा.
- तयार मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्या.
- मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यामध्ये तायर मिश्रण टाका आणि मोदक तयार करा.
- या मिश्रणाचे तुम्ही लाडूही वळू शकता.