येत्या काही दिवसात आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे घरोघरी आगमन होईल. अनेकदा कामाची धावपळ आणि नैवेद्य तयार करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे नैवेद्याचे पदार्थ बाहेरून आणले जातात. पण तुम्ही नैवेद्य घरी स्वतःच्या हातानं तयार केला तर त्याची मजा काही वेगळीच असते. मोदक, पेढे यांशिवाय बाप्पाच्या नैवेद्यात लाडूंचा समावेश असतोच.
नारंगी रंगाचे मोतीचूर लाडू पाहताचक्षणी फस्त करण्याची इच्छा होते. मोतीचूर लाडू सगळ्यांनाच आवडतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला मोतीचूर लाडू तयार करण्याची खास रेसेपी सांगणार आहोत. हा नैवेद्य बनवल्यास बाप्पासह घरातील मंडळीही तुफान खूष होतील.
साहित्य :
बेसन 60 ग्रॅम
केसर
साखर अर्धा कप
दूध 2 चमचे
तेल किंवा तूप आवश्यकतेनुसार
पिस्ता किंवा बदामाचे तुकडे
मोतीचूर लाडू तयार करण्याची कृती
1) अर्धा कप बेसन आणि पाणी एका बाउलमध्ये घेऊन एक पेस्ट तयार करा. लक्षात ठेवा त्यामध्ये गुठळ्या ठेवू नका. त्यासाठी हे मिश्रण एका चाळणीने चाळून दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्या.
2) एका पॅनमध्ये साखर आणि पाणी टाकून त्याचा पाक तयार करण्यासाठी ठेवा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर त्यामध्ये थोडं दूध टाकून थोडा वेळ शिजवून घ्या. त्यानंतर पाक तयार करा.
3) एका कढईमध्ये आवश्यकतेनुसार, तेल किंवा तूप मध्यम आचेवर गरम करा. बेसनापासून तयार केलेल्या मिश्रणामध्ये छोट्या-छोट्या छिद्रांचा झारा बुडवा आणि कढईवर नेऊन हलकेच झटका द्या. जेणेकरून बेसनाचे छोटे छोटे थेंब कढईमध्ये पडतील. दुसऱ्या झाऱ्याने कढईतील बुंदी एकत्र करा आणि पाकामध्ये टाका.
4) बेसनाच्या संपूर्ण मिश्रणाची बुंदी तयार करून घ्या. तयार बुंदी पाकामध्ये एक तासापर्यंत मुरण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाकामधून काढून लाडू वळून घ्या. मोतीचूरच्या लाडूंचा नैवेद्य बाप्पसाठी तयार आहे.