जेवणातील अविभाज्य घटक म्हणजे मीठ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मिठाशिवाय जेवण अपूर्णच असतं. त्याचप्रमाणे पदार्थांमध्ये मीठ नाही घातलं तर जेवणाला चवच येत नाही. चिमूटभर मीठ पदार्थात पडलं तर त्यामुळे पदार्थ रूचकर होण्यास मदत होते. पण जेवणात मिठाचं प्रमाण योग्य असणं गरजेचं असतं. हे प्रमाण थोडं कमी किंवा थोडं जास्त झालं तर संपूर्ण पदार्थाची चव बिघडू शकते. म्हणजेच मीठ असणं जेवणात गरजेचं असतं परंतु त्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं असतं. पण बऱ्याचदा असं होतं की, गडबडीमध्ये आपल्याकडून मिठाचं प्रमाण जास्त होतं आणि पदार्थ खारट होतो. अशावेळी काय करावं ते सुचतं नाही. पदार्थ पुन्हा तयार करणं शक्य नसतं. अशावेळी त्याच पदार्थाचा खारटपणा कमी करणं सहज शक्य असतं.
पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण जास्त झालं किंवा पदार्थ खारट झाला तर पुढील उपाय करा -
तूप -
पदार्थामध्ये मीठ जास्त झाल्यास त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे पदार्थातील मिठाचं प्रमाण संतुलित रहातं.
लिंबाचा रस -
तुम्ही तयार केलेल्या भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर त्यामध्ये लिंबाच्या रसाचे 4 ते 5 थेंब टाकावे. त्यामुळे मिठांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि भाजीची चवही बिघडणार नाही.
बटाटा -
जर तुम्ही रस्सा भाजी किंवा वरण बनवताना मीठ जास्त झालं असेल तर अशावेळी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. त्यामध्ये बटाट्याचे काप घाला. बटाटा पदार्थातील मीठ शोषून घेईल त्यामुळे त्याची चव सामान्य होईल. थोड्या वेळाने बटाट्याचे काप काढून घ्या. उकडलेल्या बटाट्यांचा वापर करणं फायदेशीर ठरेल.
चण्याची डाळ -
भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास त्यामध्ये चण्याची डाळ घालणं फायदेशीर ठरतं. त्यासाठी 2 ते 3 चमचे चण्याची डाळ पाण्यात भिजत घालावी.
दही -
एखादा पदार्थ खारट झाल्यास त्यामध्ये शक्य असल्यास तुम्ही दह्याचा वापर करू शकता. त्यामध्ये 2 ते 3 चमचे दही घाला. त्यामुळे जास्त झालेल्या मिठाचं प्रमाण संतुलित होण्यास मदत होईल.
ब्रेड -
रस्सा भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास त्यामध्ये ब्रेडचे तुकडे घालणं फायदेशीर ठरतं. ब्रेड भाजीतील एक्सट्रा मीठ शोषून घेतो. त्यामुळे खारटपणा कमी होण्यास मदत होते.
काजू -
पदार्थातील खारटपणा दूर करण्यासाठी काजूची पेस्टही फायदेशीर ठरते. त्यामुळे भाजीला वेगळी चव मिळण्यासोबतच मिठाचंही प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
पीठ (कणीक) -
एखाद्या पदार्थातील मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही पीठाचा वापर करू शकता. त्यामुळे पदार्थाचा खरटपणा कमी होतो. यासाठी पीठाचे 2 ते 3 लहान गोळे पदार्थामध्ये टाका. जास्त मीठ शोषून घेईल. काही वेळाने पीठाचे गोळे काढून टाका.