सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर पालक मिळत असून पालकाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. पालकच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न असतं. पालकच्या भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. पण बऱ्याचदा एकाच पद्धतीने तयार केलेली भाजी खाऊन आपण कंटाळतो आणि त्या भाजीकडे दुर्लक्ष करतो. तुम्हीही पालकची भाजी खाऊन कंटाळला असाल तर आता पालक स्मूदी ट्राय करू शकता. काय म्हणताय? पालक स्मूदी कधीच नाही प्यायलात? आतापासून आहारामध्ये पालक स्मूदीचा अवश्य समावेश करा. कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या संशोधनामध्ये सांगण्यात आले आहे की, पालकाची पेस्ट दूध किंवा दह्यामध्ये एकत्र करून खाल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
एका नवीन संशोधनानुसार, पालकची भाजी कापून स्मूदी तयार करून पिण्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत. हिरव्या पालेभाज्या शिजवल्यामुळे त्यांच्यातील अॅन्टीऑक्सिडंट नष्ट होतात. परंतु दही किंवा दूधामध्ये कच्ची पेस्ट एकत्र करून प्यायल्याने अॅन्टीऑक्सिडंट आणि इतर पोषक तत्वांसमवेत सर्वात आवश्यक असं पोषक तत्व लुटीन शरीराला प्राप्त होतं.
स्वीडनमध्ये लिंकोपिंग यूनिवर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, पालक उकळल्याने किंवा फ्राय केल्याने त्यातील पोषक तत्व लुटीन पूर्णतः नष्ट होतं. याआधी झालेल्या अनेक संशोधनातून एक गोष्ट समोर आली आहे की, लुटीनमुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो आणि डोळ्यांच्या समस्यांपासूनही सुटका होते.
लिंकोपिंग यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी पालकची भाजी शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास केला. त्यातून कोणत्या पद्धतीने भाजी शिजवल्यामुळे त्यातील पोषक तत्व टिकून राहतात यांवर संशोधन केले. वैज्ञानिकांनी या पदार्थांमधील लुटीनचा स्तर नियमितपणे तपासून पाहिला आणि त्यातून असं सिद्ध झाले की, कच्च्या पालकाचं दूध किंवा त्यापासून तयार केलेल्या पदार्थांसोबत एकत्र करून खाल्ल्याने सर्वाधिक आरोग्यदायी ठरतं.
पीएचडी रिसर्चर आणि अभ्यासाच्या लेखिका रोसन्ना चंग यांनी सांगितले की, पालक कोणत्याही पद्धतीने शिजवून खाऊ नये. त्याऐवजी जर तुम्ही पालक स्मूदी तयार करून त्याचं सेवन केलं तर ते अधिक फायदेशीर ठरतं. क्रिम, दूध आणि दह्यासारख्या दूधाच्या पदार्थांसोबत एकत्र करून सेवन करा.