पुणे :थंडीत बाजारात भरपूर उपलब्ध असणारी भाजी म्हणजे मटार. हिरवेगार, कोवळे मटार दाणे बघूनही भाजी करण्याची इच्छा होते. मटार उसळ, मटार करंजी अनेकदा केली जाते पण मटारचा उत्तप्पाही केला जातो. चवदार आणि हिरवागार उत्तपा झटपट तर बनतोच पण पौष्टिकही असतो. तेव्हा ही पाककृती आवार्जून घरी बनवा.
साहित्य :
- मटार एक वाटी
- हिरव्या मिरच्या चार
- कांदा बारीक चिरलेला एक (मध्यम आकार)
- कोथिंबीर पाव वाटी
- रवा एक वाटी
- पोहे अर्धी वाटी
- दही एक वाटी
- इनो किंवा फ्रुट सॉल्ट पाव चमचा
- मीठ
- तेल
कृती :
- मटार, मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून मिक्सरला फिरवून घ्या.
- दुसऱ्या मोठ्या बाऊलमध्ये रवा, भिजवलेले पोहे, दही आणि वाटलेले मिश्रण एकजीव करून घ्या. लागत असेल तर त्यात पाणी घालून सरसरीत मिश्रण बनवावे.
- आता मिश्रण अर्धा तास बाजूला ठेवून द्यावे.
- तयार मिश्रणात मीठ घालून एकजीव करावे. मिश्रण घट्टसर ठेवावे.
- पॅनवर चमचाभर तेल टाकावे आणि अगदी उत्तपा टाकण्याच्या आधी फ्रुटसॉल्ट किंवा इनो घालून एकजीव करावे,
- आता मिश्रण तव्यावर गोलाकार पसरवून झाकण ठेवावे.
- एखाद्या मिनिटानंतर उत्तपा पलटावा आणि दुसऱ्या बाजूने तेल टाकून भाजून घ्या.
- ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा सॉससोबत खायला गरमागरम मटार उत्तपा तयार.