(Image Credit : craftlog.com)
मैसूर पाक ही मिठाई खाल्ली नसेल असा क्वचितच कुणी आढळेल. जिभेवर ठेवताच विरघळणारी मैसूर पाकाची चव मोहिनी घालणारीच असते. मैसूर पाक मिठाईला ही दक्षिण भारतातील मिठाईंचा राजा म्हटलं जातं. बेसन आणि तूपापासून तयार ही मिठाई देशभरातील लोक खातात. याची चव कधीही न विसरता येणारी अशीच असते. पण मैसूर पाक मिठाईचा शोध कसा लागला हे अनेकांना माहीत नसेल. याचा संबंध म्हैसूर पॅलेसशी आहे. चला जाणून घेऊ या मिठाईच्या शोधाची कहाणी....
मैसूर पाकाचा शोध २०व्या शतकात लागला. त्यावेळी म्हैसूरमध्ये कृष्ण राजा वाडियार IV यांचं राज्य होतं. त्यांच्या शाही स्वयंपाकीचं नावं काकसूर मडप्पा. एक दिवस त्याने राजासाठी जेवण तयार केलं, पण गोड पदार्थ तयार करायचं तो विसरला.
(Image Credit : oneindia.com)
राजाच्या ताटात गोड पदार्थाची जागा रिकामी होती. हे बघून मडप्पाने लगेच बेसन, तूप आणि साखरची एक मिठाई तयार केली. राजाचं जेवण झाल्यावर ही मिठाई त्याने त्यांना दिली. राजाला ही मिठाई फारच पसंत पडली. त्यांनी लगेच मडप्पाला या मिठाईचं नाव विचारलं.
(Image Credit : vellankifoods.com)
मजेदार बाब ही होती की, मडप्पाने ही मिठाई पहिल्यांदाच तयार केली होती, त्यामुळे त्यालाही याचं नाव माहीत नव्हतं. आता राजाला उत्तर तर द्यायचं होतं. म्हणून त्याने पटकन मैसूर पाक असं सांगितलं. कन्नड भाषेत पाकाचा अर्थ मिठाई असा होतो. आता ही मिठाई म्हैसूर पॅलेसमध्ये तयार करण्यात आल्याने त्याने या पॅलेसचंच नाव दिलं.
(Image Credit : food.manoramaonline.com)
राजाला वाटलं की, या मिठाईची चव महालाबाहेरील लोकांनी घेता आली पाहिजे. त्यामुळे त्यांनी म्हैसूर पॅलेसबाहेर एक दुकान मांडून ही मिठाई विकण्याचा आदेश दिला. अशाप्रकारे मैसूर पाक राजमहालातून बाहेर आली आणि कर्नाटकातील घराघरात पोहोचली.
(Image Credit : deccanherald.com)
कर्नाटकातील या मिठाईची चव आज जगभरात लोकप्रिय आहे. इथे दसऱ्याला केल्या जाणाऱ्या विशेष जेवणात या मिठाईला स्थान असतं. कर्नाटकमध्ये गुरू स्वीट्स नावाचं दुकान यासाठी फारच लोकप्रिय आहे. हे दुकान मडप्पाचे वंशज चालवतात. तुम्हीही कधी कर्नाटकला गेले तर येथील मैसूर पाक एकदा नक्की चाखून बघा.