(Image Creadit : archanaskitchen.com)
अनेकदा घरामध्ये गोड पदार्थ म्हणून शिरा केला जातो. शिरा बनवायलाही अगदी सोपा आणि झटपट करता येतो. पण शिऱ्याला एखाद्या नव्या पदार्थांचा फ्लेवर दिला तर त्याची चव आणखी वाढते. बऱ्याचदा शिऱ्यामध्ये आंबा, अननस, सफरचंद यांसारख्या फळांचा गर घातला जातो. त्यामुळे शिऱ्याला वेगळा फ्लेवर मिळतो. आणखी वेगळ्या फ्लेवरमध्ये शिरा तयार करायचा असेल तर तुम्ही चॉकलेट शिरा ट्राय करू शकता. चॉकलेट म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हा शिरा नक्की आवडेल.
साहित्य :
- एक वाटी रवा
- दोन चमचे साजूक तूप (तेलही वापरू शकता)
- दोन चमचे कोको पावडर (किंवा चॉकलेट फ्लेवरचा बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स)
- साखर पाव वाटी
- दीड वाटी पाणी (दूधही वापरू शकता)
- सुका मेवा
कृती :
रवा तुपावर खमंग भाजून घ्यावा.
दुसऱ्या भांड्यात पाणी गरम करत ठेवावं.
पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये साखर घालून विरघळवून घ्यावी.
पाण्यामध्ये साखर पूर्ण विरघळली की, त्यामध्ये दोन चमचे कोको पावडर घालावी.
तूपामध्ये खमंग भाजलेल्या रव्यामध्ये कोको पावडर आणि साखरेचा पाक घालावा.
त्यानंतर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावं.
किमान पाच मिनिटं तरी मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्या.
त्यानंतर त्यावर सुका मेवा घाला. शिरा खाण्यासाठी तयार आहे.
तुम्ही गरम किंवा थंड करूनही शिरा खाऊ शकता.