गुळ आपल्या खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. अत्यंत प्राचीन काळापासून भारतीय व्यंजनांमध्ये गुळाचा वापर करण्यात येतो. संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी गुळ तयार होतो. तसेच गुळ वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ऊसापासून तयार करण्यात आलेला गुळ, पामच्या झाडापासून आणि खजुराच्या झाडापासून तयार करण्यात आलेला गुळ. अनेक प्रांतामध्ये ऊसापासून तयार केलेला गूळ आणि पामच्या झाडापासून तयार केलेला गुळ आढळून येतो परंतु खजुराच्या झाडापासून तयार केलेला गुळ मात्र संपूर्ण भारतात फक्त पश्चिम बंगालमध्ये तयार करण्यात येतो. या गुळाचे उत्पादन फक्त हिवाळ्यात करण्यात येते. इतर गुळांपेक्षा खजुराच्या झाडापासून तयार करण्यात आलेला गुळ फार वेगळा असतो. त्याची चव आणि सुगंधही फार निराळा असतो. या गुळापासून अनेक पदार्थ तयार करण्यात येतात. फक्त त्या पदार्थांमध्ये साखरेऐवजी खजुराच्या गुळाचा वापर करण्यात येतो.
खजुराचा गुळ हा खजुराच्या झाडामधून निघणाऱ्या चिकापासून तयार करण्यात येतो. खजुराच्या झाडाच्या खोडाला एक चीर देऊन त्यातून बाहेर येणारा चिक एका भांड्यामध्ये साठवून ठेवण्यात येतो. या भांड्यामध्ये चीक जमा झाला की, तो चीक एका लोखंडाच्या कढईमध्ये आटवण्यात येतो. आठवल्यानंतर हा चिक घट्ट होतो. त्यानंतर हा चिक थंड केला जातो. तो थंड झाल्यानंतर त्याच्या ढेपा केल्या जातात.
हा गुळ फक्त थंडीतच केला जातो. उन्हाळ्यात हा गुळ आबंतो त्यामुळे त्याची चव बिघडते. हा गुळ तयार करण्यासाठी कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. हा पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने तयार करण्यात येतो.
सध्या खजुराच्या गुळाचे उत्पादन घरगुती पद्धतीने होत असल्यामुळे ते फार कमी होते. या ठिकाणची झाडं पाडल्यामुळे येथील गुळ उत्पादनावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
खजुराच्या गुळाचे आरोग्यदायी फायदे :
- गुळ उष्ण असल्यामुळे हिवाळ्यातच याचा समावेश आहारात करणं फायदेशीर ठरतं.
- गुळ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
- अनेक जीवनसत्वे आणि कर्बोदकं असल्यामुळे शरीराला उत्साहपूर्ण ठेवण्यासाठी गुळ उपयोगी ठरतो.
- गुळात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी खनिज तत्वे असतात.
- खजुराच्या गुळाचा नियमित आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होते.
- खजुराच्या गुळात आयर्न असल्यामुळे हा गूळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते आणि शरीराला अनेमियापासून संरक्षण देते.
- थंडीमुळे झालेल्या सर्दी आणि खोकल्यावरही गूळाचे सेवन करणं उपयुक्त ठरते.