Amla shots health benefits : हिवाळ्यात वेगवेगळी फळं बाजारात मिळतात. त्यातील एक महत्वाचं फळ म्हणजे आवळा. आयुर्वेदात आवळ्याला अमृत मानलं जातं. आवळ्यामध्ये अनेक पोषक तत्व जसे की, व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. यामुळे आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. एकंदर तर काय तर आवळा एक सुपरफूड आहे. ज्याचा तुम्ही रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. खासकरून हिवाळ्यात तुम्ही आवर्जून आवळ्याचं सेवन केलं पाहिजे. अशात ते कसं करावं, कधी करावं आणि याचे काय फायदे होतात जे जाणून घेऊया.
कसा बनवाल आवळ्याचा ज्यूस?
आवळ्याचा ज्यूस बनवण्यासाठी ५ ते ६ आवळे घ्या, आल्याचा एक तुकडा, मध आणि पाणी घ्या. पहिल्यांदा आवळे चांगले धुवून घ्या आणि त्यांचे छोटे छोटे तुकडे करा. बीया बाजूला काढा. नंतर आवळ्याचे तुकडे मिक्सरमध्ये टाकून पेस्ट बनवा. पेस्ट एका ग्लासमध्ये काढा आणि त्यात थोडं पाणी मिक्स करा. यानंतर यात आल्याची पेस्ट आणि मध टेस्टनुसार टाका. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करा आणि याचं सेवन करा.
हिवाळ्यात आवळा ज्यूस पिण्याचे फायदे
- आवळ्यात ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.
- आवळ्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
- आवळ्याच्या ज्यूसने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
- आवळ्याचा ज्यूस तणाव कमी करण्यासही मदत करतो.
- आवळ्याच्या ज्यूसने रोजप्रतिकारक शक्तीही वाढते.
- आवळ्याच्या ज्यूसने केसांची वाढही होते आणि केसगळती थांबते.
कधी प्यावा आवळ्याचा ज्यूस?
आवळ्याचा ज्यूस तुम्ही रोज रिकाम्या पोटी सेवन करू शकता. याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण जर तुम्हाला एखादी एलर्जी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच याचं सेवन करा. तसेच आवळ्याचा ज्यूस रोज ३० मिलीपेक्षा जास्त पिऊ नये. कारण याच्या जास्त सेवनाने नुकसानही होतं.
कुणी पिऊ नये आवळ्याचा ज्यूस?
- किडनीसंबंधी समस्या असलेल्या लोकांनी आवळ्याच्या ज्यूसचं सेवन करू नये. कारण या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम असतं, जे किडनीच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं.
- थायरॉईडच्या रूग्णांसाठी सुद्धा आवळ्याचा ज्यूस सेवन करणं घातक ठरू शकतं. कारण यात आयोडिन असतं, जे थायरॉईडमध्ये चांगलं मानलं जात नाही.
- ज्या लोकांना पोटासंबंधी समस्या आहे, त्यांनीही आवळ्याच्या ज्यूसचं सेवन करू नये. याने पोटात जळजळ आणि अॅसिड रिफ्लक्स होऊ शकतं.
- तसेच गर्भावस्थेतही आवळ्याच्या ज्यूसचं सेवन टाळलं पाहिजे. याने समस्या वाढू शकतात.
- त्याशिवाय तुम्ही सर्जरीआधी किंवा नंतर आवळ्याच्या ज्यूसचं सेवन करू नये. असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. याने ब्लीडिंग जास्त होण्याचा धोका असतो.