सध्या माणसाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत वेगळेपण पहायला मिळतं. तसंच काहीसं स्वयंपाक घराबाबतीतही आहे. आधीच्या चुलीची जागा स्टोव्हने घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये आणखी बदल होऊन घरोघरी आता गॅस शेगड्या आढळून येतात. तसंच काहीसं स्वयंपाक घरातील भांड्यांबाबत झालं आहे. आधी स्वयंपाकासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला जात असे. त्यानंतर तांबे, पितळ, अॅल्युमिनिअम, स्टील यांसारख्या भांड्यांचा वापर केला जाऊ लागला. आता त्यामध्ये आणखी बदल होऊन आता नॉन स्टीक भांड्यांसारखी अनेक प्रकारची भांडी बाजारात उपलब्ध आहेत. बाजारात उपलब्ध असणाऱ्या भांड्यांबाबत अनेकांना योग्य ती माहिती नसते. त्यामुळे अनेकदा भाड्यांचा वापर करणं टाळलं जातं. परंतु कोणत्या भांड्यामध्ये कोणता पदार्थ शिजवणं चांगलं असतं हे प्रत्येकाला ठाऊक असणं गरजेचं असतं. सध्या अनेक प्रकारची भांडी स्वयंपाकासाठी वापरण्यात येतात. त्यामध्ये माती, काच, लोखंड, तांबा, पितळ, स्टील, अॅल्युमिनिअम, नॉनस्टिक या भांड्यांचा समावेश होतो.
काचेच्या भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न ठेवणं अत्यंत लाभदायक असतं कारण काच त्या पदार्थांमध्ये असणाऱ्या आम्ल, क्षार यांसारख्या घटकांवर कोणतीही रासायनिक प्रक्रीया करत नाही. परंतु अन्न शिजवण्यासाठी बाजारात जी काचेची भांडी उपलब्ध आहेत ती फार महाग असून ती फुटण्याची शक्यता अधिक असते.
फार पूर्वीपासून लोखंडाच्या भांड्यांचा वापर अन्न शिजवण्यासाठी करण्यात येतो. लोखंड उष्णता सगळीकडे बरोबर प्रमाणात पसरवतो. ज्यामुळे या भांड्यांमध्ये पदार्थ सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजण्यास मदत होते. लोखंडाचा तवा, कढई इत्यादींचा वापर प्रत्येक घरामध्ये सर्रास करण्यात येतो.
चणे, कारलं, भेंडी किंवा सुक्या हिरव्या पालेभाज्या करण्यासाठी लोखंडाच्या कढईचा वापर करण्यात येतो. यामुळे हे पदार्थ फक्त चवदारच नाही तर आकर्षकही दिसतात. त्याचबरोबर त्यांची पौष्टीकता देखील वाढते. लोखंडाची भांडी फार कमी किमतीत उपलब्ध होतात. परंतु, ही भांडी स्वच्छ करणं फार कठीण असतं. कारण लोखंडाच्या भांड्यांना लगेचच गंज लागतो.
हल्ली प्रत्येक गृहिणी नॉनस्टिक भांड्यांना पसंती देताना दिसते. ही भांडी डोसा, टोस्ट यांसारखे पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येतात. कारण या भांड्यांमध्ये पदार्थ भांड्यांना चिकटत नाही. या भांड्यांमध्ये धातूवर 'टेफलान' नावाची एक लेयर चढवण्यात येते. ज्यामुळे पदार्थांमधील आम्ल आणि इतर घटक धातूसोबत रायासनिक प्रक्रिया करू शकत नाहीत. ही भांडी बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात. परंतु फार महाग असतात.
प्रत्येक भांड्याचे स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. अशातच प्रेशर कुकर किंवा प्रेशर पॅनचा वापर करणं सर्वात उत्तम आहे. तसेच पितळेच्या भांड्यांमध्ये आंबट पदार्थ म्हणजेच आम्ल असलेले पदार्थ ठेवणं टाळावं. कारण असं केल्याने धातू पदार्थांमध्ये मिसळतो आणि ते पदार्थ मानवी शरीरासाठी विषारी ठरतात.
स्टेनलेस स्टीलची भांडी सर्रास सर्व स्वयंपाक घरांमध्ये आढळून येतात. ही भांडी स्वच्छ करणही सहज शक्य असतं. स्टेनलेस स्टील एक मिश्रित धातू आहे. या धातूला लोखंडाप्रमाणे गंज लागत नाही आणि पितळेप्रमाणे पदार्थांवर प्रक्रियाही होत नाही. परंतु स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवताना काळजी घेणं गरजेचं असतं. नाहीतर पदार्थ जळण्याची शक्यता असते.