सध्या आपल्या मॉर्डन लाइफस्टाइलमध्ये बुफे लंच किंवा डिनरची क्रेझ वाढताना दिसत आहे. पूर्वीच्या पंक्तीची जागा आता अगदी सहजपणे बुफेने घेतली असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. अजुनही वयोवृद्ध लोकांकडून वाढत्या बुफेच्या क्रेझबाबत टोमणे ऐकायला मिळतात. त्यांचा नेहमी एकच आग्रह तो म्हणजे, बुफे म्हणजे उगाच पाश्चात्य संस्कृतीचा आणलेला वाव आहे. कशाला हवीत ही थेरं? पंगतीतलं जेवणं म्हणजे अन्नपुर्णेनं तथास्तु म्हटल्यासारखं.... वाढप्यांनी आग्रहाने ताटात द्यावं आणि जेवणाऱ्याने तेवढ्याच आत्मियतेने ते पोटात ढकलून तृप्त व्हावं! असं आहे का तुमच्या बुफेत....? असो, पण खरंच सध्या समारंभांसोबतच अनेक बड्या रेस्टॉरंट्समध्येही बुफे पाहायला मिळतात. दररोज कटाक्षाने डाएट फॉलो करणारी माणसही या बुफेच्या मोहापासून स्वतःला थांबवू शकत नाहीत. त्यामध्ये त्यांच तरी काय चुकतं म्हणा... एकाचवेळी खाण्याचे एवढे चमचमीत पदार्थ पाहून ते खाण्यापासून कोण स्वतःला आवरू शकेल. पण या मोहापायी आपण बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त कॅलरीचं सेवन करतो. परिणामी त्यानंतर उद्भवणाऱ्या शरीराच्या अनेक समस्या... परंतु तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही बुफेमध्येही तुमच्या डाएटवर कंट्रोल ठेवू शकता. फक्त काही टिप्स फॉलो कराव्या लागतील तर काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे लागेल. प्रश्न पडला असेल ना? अहो अगदी सहज शक्य आहे. एकदा करून तर पाहा....
सर्वात आधी जाणून घेऊयात नक्की बुफे म्हणजे आहे तरी काय?
बुफे म्हणजे जेवणाची मॉर्डन पद्धत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या पंगतीमध्ये वाढणारी मंडळी सगळं काही येऊन स्वतः वाढतात. परंतु या बुफेमध्ये जेवणाऱ्या माणसांनी स्वतः आपल्या ताटामध्ये जेवण वाढून घ्यायचे असते. बुफे अनेक ठिकाणी अरेंज करण्यात येतो. सध्याच्या लग्न समारंभांमध्ये किंवा इतरही अनेक समारंभांमध्ये सर्रास बुफे पद्धतीने जेवणाची सोय करण्यात येते. त्याचप्रमाणे सध्या अनेक रेस्टॉरंट्समध्येही बुफे पद्धत असते. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसापाठी त्याचा दर आकारण्यात येतो.
कधी-कधी जाणं ठरतं योग्य
सध्याच्या धावपळीच्या जगात आरोग्याच्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी अनेक लोकं आपल्या आरोग्याबाबत फार दक्ष असतात. अशातच ते आहारात संतुलित पदार्थांचा समावेश करण्यासोबतच हेवी डाएटदेखील फॉलो करतात. अशा लोकांनी बुफे पासून थोडं लांब राहावं किंवा कधीतरीच अशा ठिकाणी जावं. तुम्ही वर्षातून तीन ते चार वेळा जाऊ शकता. आणि जर तुम्हाला असं करणं शक्य नसेल तर छोटे बुफे असलेल्या रेस्टॉरंट्सची निवड करावी.
छोट्या प्लेटमध्ये पदार्थ घ्या
बुफेमध्ये अनेक पदार्थ ठेवलेले असतात. अशातच आपल्याला स्वतःला त्या पदार्थांपासून लांब ठेवणं शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून तुम्ही जेवणं वाढून घेण्यासाठी छोट्या प्लेट्सची निवड करू शकता. साधारणतः बुफेमध्ये तीन प्रकराच्या प्लेट्स ठेवल्या जातात. डिनरसाठी, सलाडसाठी आणि गोड पदार्थांसाठी अशा वेगवेगळ्या प्लेट्स ठेवलेल्या असतात. तुम्ही मीडियम साइझच्या प्लेटची निवड करू शकता. त्यामुळे तुम्ही जास्त पदार्थ वाढून न घेता. काहीच पदार्थच वाढून घेतात.
खाण्यास सुरूवात करताना काळजी घ्या
बुफेमध्ये जेवणाची सुरूवात करताना थेट जेवणाकडे न जाता सलाडने सुरुवात करा. सलाडमध्ये साधारणतः दोन पर्याय असतात. एक म्हणजे फ्रुट सलाड आणि दुसरं म्हणजे व्हेजिटेबल सलाड. यापैकी तुम्हाला जो प्रकार आवडत असेल त्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. त्यामुळे तुम्ही बुफेमधील अनहेल्दी पदार्थांपासून स्वतःचा बचाव करू शकता.
पहिल्यांदा नक्की कोणते पदार्थ आहेत ते पाहून घ्या
प्लेट घेण्याआधी एक फेरी मारून सर्व पदार्थ नीट पाहून घ्या. सर्व पदार्थांपैकी हेल्दी पदार्थांची निवड करा. असं केल्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून स्वतःला रोखू शकता.
गोड पदार्थ सर्वांसोबत शेअर करा
जर तुमच्या प्लेटमध्ये एखादा गोड पदार्थ असेल तर तो एकट्याने न खाता एखाद्या व्यक्तीसोबत शेअर करा. अनेक बुफेंमध्ये मीनी डेझर्टही असते, ज्यामुळे तुम्ही गोड पदार्थाचा आनंदही घेऊ शकता आणि जास्त खाण्यापासून बचा करू शकता.
जास्त पाणी प्या
जेवणामुळे तुम्ही आधीच खूप कॅलरींच सेवन करता. अशातच तुम्ही ड्रिंक्स मार्फत कॅलरी घेणं शरीरासाठी चांगलं नसतं. त्यामुळे इतर ड्रिंक्सऐवजी भरपूर पाणी पिणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. यामुळे तुमचं पोट पण भरल्यसारख वाटेल आणि तुम्ही जास्त खाण्यापासून स्वतःला रोखू शकाल.
जेवणाच्या टेबल्सपासून थोडं लांब बसा
साधारणत: एखादी व्यक्ती बुफेमध्ये फक्त 2 ते 3 वेळाच जेवण वाढून घेते. एखादी व्यक्ती 5 ते 6 वेळा जेवण वाढून घेत असेल अशा प्रकार फार क्वचित दिसून येतो. जर तुम्ही जेवण ठेवलेल्या टेबलपासून लांब बसलात तर तुम्ही सारखे जाऊन जेवणं वाढून घेणार नाही. कंटाळा कराल. यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून स्वतःला रोखू शकता.