- सारिका पूरकर-गुजराथीभारतीय विवाह सोहळा म्हटला की भव्य मंडप सजावट, रोषणाई, संगीत मैफली, भरजरी कपड्यांचा थाट हे सगळे ओघानं आलंच. याव्यतिरिक्त भारतीय विवाह सोहळ्याचे आणखी एक कनेक्शन आहे, ते म्हणजे सोनं. सोने या मूल्यवान, प्रतिष्ठा वृंद्धिंगत करणा-या धातूशिवाय भारतीय विवाह सोहळा नक्कीच अपूर्ण राहील.डोक्यापासून पायापर्यंत नववधूला सोन्याच्या दागिन्यात मढवून तिचा सन्मान केला जातो. सोन्याचे दागिने म्हणजे तिच्यासाठी केवळ श्रुंगार राहात नाही तर अनेकांचे आशीर्वाद बनून जातात. कारण भारतात मुलीच्या मामांनी तिच्या लग्नात भाचीकरिता साड्या, दागिने भेट म्हणून देण्याची प्रथा आहे. मामा मोशावळा म्हणूनही या प्रथेस संबोधलं जातं. मामानं दिलेले हे सोन्याचे दागिने, साड्या लग्नमंडपात दिमाखात मिरवले जातात. सांगायचे तात्पर्य हेच की, भारतीय विवाह सोहळ्यात सोन्याची एक महत्वपूर्ण जागा आहे. परंतु, केवळ दागिने, भेटवस्तू यापुरतेच सोने आता मर्यादित राहिलेले नाहीये बरं का !!!होय, तर हे सोने जाऊन पोहोचलेय थेट विवाहातील पंक्तींमध्ये..हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या एका विवाह समारंभात पाहुण्यांना चक्क सोन्याचा भात सर्व्ह करण्यात आला.आत्ता बोला!विवाहासारखा मंगल सोहळा नेहमीच संस्मरणीय व्हावा, आलेले पाहुण्यांना साग्रसंगीत मेजवानी देता यावी याकरिता भारतात अनेक प्रयत्न केले जातात. असाच हा एक प्रयत्न होता. व्हॉट्स अॅप आणि अन्य सोशल मीडियावर या लग्नातील सोन्याच्या भाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. त्यामुळे हा सोन्याचा भात चर्चेचा विषय बनला आहे. नाव जरी सोेन्याचा भात असला तरी सोने टाकून तो शिजवलेला नाहीये. या व्हिडिओत असं दिसतंय की केळीच्या पानावर भात वाढल्यानंतर त्यावर वाढपी सोन्याचा वर्ख ठेवतोय. त्यावर मग रस्सम, सांबर ओतला जातोय.