सामान्यतः घरातील मोठी माणसं अनेकदा लहान मुलांना हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देत असतात. परंतु हिरव्या पालेभाज्या म्हटलं की, मुलं मात्र नाक तोंड मुरडण्यास सुरुवात करतात, अनेक कारणं सांगतात आणि या हिरव्या पालेभाज्या खाणं टाळतात. या भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन, खनिज पदार्थ आणि अॅन्टी-ऑक्सिडंट असतात, हे आपण सारेच जाणतो. तसेच प्रोटिन्स, फायबर्स आणि मिनरलयुक्त भाज्यांचं सेवन करणं आरोग्य जपण्यासाठी आणि त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊयात अशा काही भाज्यांबाबत ज्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
1. हिरवा भोपळा
भोपळा म्हटलं की, सगळेचजण त्यापासून दूर पळतात. परंतु, यामध्ये फोलिक अॅसिड, व्हिटॅमिन-सी, झिंक आणि मॅगनिज मुबलक प्रमाणात असतं. ही तत्त्व स्कीन आणि हाडांसाठी फायदेशीर ठरतात.
2. कारलं
कारल्याचं नाव काढताच कडू चवीच्या विचारानेच अगदी नकोसं होतं. पण हेच कडू कारलं शरीरासाठी गुणकारी ठरतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर आहारात कारल्याचा समावेश करणं योग्य ठरतं. तसेच कारल्यामुळे डायबिटीज आणि बद्धकोष्ठापासून शरीराची सुटका होण्यास मदत होते.
3. वांगी
फायबरचं उत्तम स्त्रोत असलेलं वांग कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी काम करतं. त्याचप्रमाणे डायबिटीजच्या रूग्णांसाठीही हे फायदेशीर ठरतं.
4. भेंडी
भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतं आणि सोडियमचं प्रमाण फार कमी असतं. हे कॅलरी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. याशिवाय ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रूग्णांसाठी भेंडी वरदान ठरते.
5. दोडका
हिरव्या पालेभाज्यांमध्ये समाविष्ट होणारा दोडका आरोग्यवर्धक समजला जातो. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी, रक्त स्वच्छ ठेवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि किडनीच्या आजारांपासून सुटका करून घेण्यासाठी दोडका फायदेशीर ठरतो.