आपल्याकडे सणावारांची काहीच कमतरता नाही. साधारण गणेशोत्सवापासून मोठमोठ्या सणांची जी सुरुवात होते, ती साधारण वर्षअखेर म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत सुरूच असते. हे सगळे उत्सव आपण अतिशय उत्साहात साजरे करतो. ते केलेही पाहिजेत; पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, की हे सण आपल्या आनंदासाठी असतात. त्यातून आपल्याला आनंदच मिळाला पाहिजे. नंतर त्याचं आर्थिक दडपण आपल्यावर यायला नको. त्यासाठी काही गोष्टी आपण अतिशय काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. तर आपल्यासाठीही हे सारे सण अतिशय आनंदाचे जातील. त्यासाठीच्या या काही युक्त्या.
१- सणासुदीला काही खर्च अत्यावश्यक असतात. ते आपल्याला टाळता येत नाही. किराणा, गोडधोड, नवे कपडे, भेटवस्तू आदी. याशिवाय ठरवून काही गोष्टीही आपण खरेदी करतो. उदाहरणार्थ सोनं, चांदी, कार, वॉशिंग मशीन वगैरे. या साऱ्या गोष्टींची वेगवेगळी यादी तयार करा आणि त्यानुसार आपल्या पैशाचं व्यवस्थापन करा.२- सर्वात आधी आपल्या बँकेचा, म्हणजे आपल्या खिशाचा सल्ला घ्या. त्यात कोणत्या गोष्टी येऊ शकतात, हे तपासा. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची नोंद करा. त्यात कोणत्या गोष्टीवर तुम्ही किती खर्च करू शकता, हे लिहून काढा.३- शक्य झालं तर एक गोष्ट आवर्जून करा, ती म्हणजे सणासुदीसाठी एक स्वतंत्र बँक अकाऊंट तयार करा. त्यात सणांसाठी लागणारे पैसे जमा करत चला. म्हणजे आपल्याकडे प्रत्यक्षात किती पैसे जमा आहेत आणि त्यात कोणत्या गोष्टीवर आपण किती खर्च करू शकतो, याचा नेमका अंदाज आपल्याला येईल. ४- सणासुदीच्या काळात वेगवेगळ्या ऑफर्स येतात; पण आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्याच आहेत, (फक्त) त्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करा. ज्या वस्तूंवर मोठी सवलत आहे, कॅश बॅक आहे अशा वस्तूंची क्वॉलिटीही चेक करून घ्या आणि स्वस्तात त्या वस्तू मिळवा.५- आणखी एक सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘पर्सनल लोन’च्या मोहात पडू नका. ज्या वस्तू आपल्या आवाक्याबाहेरच्या आहेत, त्याही अशा कर्जामुळे आपल्या आवाक्यातल्या वाटायला लागतात; पण या सापळ्यात अडकू नका.