>> मेघना सामंत
उपवास असो-नसो, मराठी माणसं साबुदाण्याच्या प्रेमात असतात. तसंही, उपवासाला साबुदाणा खावा अशी काही वैदिक काळापासूनची प्रथा नव्हती. कारण तेव्हा साबुदाणा हा प्रकारच भारतात नव्हता. किंबहुना साबुदाण्याची खिचडी (आणि वडे, थालीपीठ इ.) हे भारताच्या खाद्येतिहासात आधुनिकोत्तर- जेमतेम पंचाहत्तर-शंभर वर्षं वयाचे पदार्थ.
टॅपिओका पर्ल ऊर्फ साबुदाणा आपल्याकडे आला इंडोनेशियातून. टॅपिओका (अथवा कसावा) हा रताळ्यासारखा पिष्टमय, पोटभरीचा भूमिकंद मूळचा ब्राझीलमधला. अठरावं शतक संपतासंपता तो स्थलांतर करून आग्नेय आशियात आला आणि स्थिरावला. या भूभागाशी भारताचा सांस्कृतिक सलोखा. शिवाय ब्रिटिशांचा भारत ते अतिपूर्व आशिया असा व्यापारमार्गही होता. त्यांनीच एकोणिसाव्या शतकात टॅपिओकाला भारताच्या किनाऱ्यांवर आणलं. या कंदापासून मोती म्हणजेच साबुदाणे बनवण्याची कलादेखील ब्राझीलहून व्हाया इंडोनेशिया भारतात आली. (साबुदाण्याला काहीजण सॅगो म्हणतात, पण सॅगो वेगळा- तो ताडवर्गीय झाडापासून बनतो.)
१८६०-१८८०च्या दरम्यान केरळमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती होती. तेव्हा भरपूर पाणी पिणाऱ्या भातशेतीपेक्षा टॅपिओकाची लागवड फायदेशीर ठरेल असं लक्षात आल्यावरून त्रावणकोर संस्थानाचे महाराज विशाख थिरुनल (हे नावाजलेले कृषितज्ज्ञ होते) यांनी टॅपिओकाचं उत्पादन वाढवण्यासाठी खास प्रोत्साहन दिलं. एवढंच नाही तर तो कसा शिजवावा, त्याचे काय पदार्थ बनवावे यावर मार्गदर्शनपर लेखनही केलं. केरळ आणि तमिळनाडूने साबुदाण्याच्या उत्पादनात आघाडी घेतली. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तांदळाची टंचाई झाली तेव्हाही साबुदाण्यांनीच नड भागवली. साबुदाण्याचा भूक भागवण्याचा गुणधर्म ओळखून त्यापासून आधी खीर-पायसम् आणि हळूहळू उपवासाचे सारे पदार्थ बनले असावेत. महाराष्ट्रातल्या (की इंदौरच्या?) कल्पक गृहिणींनी विदेशांतून इथे नांदायला आलेले शेंगदाणे, साबुदाणे, बटाटे, मिरच्या, एकत्र करून अस्सल भारतीय तुपाची फोडणी घातली आणि खिचडी पकवली.
जन्मगावी- ब्राझीलमध्ये टॅपिओकाच्या पिठाचे डोसे रोजच्या जेवणात असतात. आग्नेय आशियात त्याने जम बसवलाय. थायलंड, फिलिपीन्स इथली साबुदाण्याच्या घट्ट खिरीसारखी पण नारळाचं दूध आणि आंबे, अननस अशी फळं घातलेली डेझर्ट्स अत्यंत देखणी आणि चवीलाही बहारीची. टॅपिओका पर्ल पॉरिज अमेरिकेत चलनात आहे. साबुदाणे घातलेल्या तैवानी बबल टीवर खाद्यरसिकांच्या उड्या पडतात. आणि साबुदाण्याची खिचडी? ती आज भारतात आणि भारतीय माणसं स्थायिक झालेल्या कित्येक देशांत टॅपिओका पर्ल पिलाफ; या नावाने कम्फर्ट फूड म्हणून लोकप्रिय होतेय.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत)