- सारिका पूरकर-गुजराथीसध्या नोकरदारांचं जीवन हे घड्याळाच्या काट्यांच्या दावणीला बांधलं गेलंय. रोजी-रोटीसाठी घड्याळ सांगेल तसं जो-तो धावतोय . पहाटे सुरु होत असलेली ही धावपळ मध्यरात्रीपर्यंत अव्याहतपणे सुरु असते. साहजिकच त्यामुळे आज माणसाच्या जीवनशैलीत प्रचंड बदल झाले आहेत. या जीवनशैलीचे काही नकारात्मक परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. त्यातीलच एक म्हणजे टिचभर पोटासाठी तो जी ही धावपळ करतोय, त्या पोटात दोन घास ढकलायलादेखील त्याला कधी कधी वेळ मिळत नाहीये.. मग कुठे खा वडापाव, कुठे चहाच्या कपावरच भूक भागव असं अनेकांचं सुरू असतं.
पण आरोग्यासाठी हे अत्यंत घातक आहे. यामुळे अनेकांना अनेक प्रकारच्या कमतरता जाणवताय. अनेकांच्या वाट्याला गंभीर आजारही यामुळे आलेत. प्रोटीन, कॅल्शियमची कमतरता वाढतेय, त्यातून उद्भवणारे आजार बळावू लागलेय.. असं बरंच काही धावपळ आणि त्यातून खाण्यापिण्याकडे होणारं दुर्लक्ष यामुळे माणसाला सहन करावं लागतंय.
या अत्यंत गंभीर विषयावर आणि समस्येवर बंगळुरु येथील जुना मद्रास रोडवरील श्री व्यंकटेशवरा या पेट्रोल पंपाचे संचालक प्रकाश राव यांनी खूप चांगला उपाय शोधला आहे. नोकरदार, विद्यार्थी हे कामाच्या व्यापामुळे, धावपळीमुळे, कामावर, शाळेत, आॅफिसमध्ये वेळेत पोहोचण्याच्या टेन्शनमुळे दूपारचे जेवण करु शकत नाही, असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पेट्रोल पंपावर जो पेट्रोल भरण्यासाठी येईल त्यासाठी मोफत भोजन अन नाश्त्याची व्यवस्था केली आहे.
प्रकाश राव या अनोख्या संकल्पनेबद्दल सांगतात, की माणूस कितीही धावपळीत असला तरी गाडीत पेट्रोल टाकल्याशिवाय तो काही जाणार नाही. म्हणूनच माझ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असतानाच उत्तम चवीचे, स्वादिष्ट भोजन त्या ग्राहकांकरिता पॅक करण्यात येईल. यासाठी कोणतेच शूल्क आकारलं जाणार नाही. शाकाहरी व मांसाहरी असे दोनही प्रकारचं जेवण आणि नाश्ता प्रकाश राव त्यांच्या पेट्रोल पंपावर मोफत देणार आहोतइंडियन आॅईल कॉर्पोरेशनच्या सहकार्यानं राव यांनी हा अभिनव उपक्र म हाती घेतलाय. महिनाभर मोफत भोजन आणि नाश्ता हा उपक्र म ते राबवणार आहेत. त्यानंतरही हा उपक्रम ते सुरु ठेवणार आहेत, मात्र त्यासाठी ते ठराविक शूल्कआकारणार आहेत. पेट्रोल भरायचे नाही परंतु, भोजन हवे आहे अशा ग्राहकांसाठीही ही सेवा सशूल्क उपलब्ध असणार आहे.दरम्यान, या अनोख्या कॅन्टीनसाठी जवळपासच्या भागांमध्ये विविध पदार्थ बनवून नंतर ते पेट्रोल पंपावर आणले जातील, तसेच याठिकाणी ते ग्राहकांसाठी गरम करून पॅॅक करून दिले जातील. या मोफत भोजनायलयासाठी अत्यंत कुशल स्वयंपाकी काम करीत आहेत. तसेच स्नॅक, बेकरी उत्पादनं यांसाठी इस्कॉनशी करार करण्यात आला आहे.
मोफत भोजनाच्य या संकल्पनेसाठी राव यांना काही आर्थिक नुकसानही सोसावं लागणार आहे. परंतु, त्याबद्दल त्यांना कसलीही तक्रार नाहीये. तसेच नागरिकांना पोटभर अन्न देऊन थोडं सामाजिक कामही आपल्या हातून घडणार असल्याचं प्रकाश रावं यांचं मत आहे. हा उपक्र म इंडियन आॅईल कॉर्पोरेशनच्या अन्य 100 पेट्रोल पंपावर देखील सुरु व्हावा, अशी प्रकाश राव यांची इच्छा आहे