सध्या सर्वत्र थंडीची चाहूल लागताना आपण पाहत आहोत...प्रत्येक ऋतूंप्रमाणे आपल्याकडे स्पेशल डिश खाण्याची पद्धत आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जसं की उन्हाळ्यात कोकम सरबत, पावसाळ्यात गरमागरम कांदेभजी आणि हिवाळ्यात सुका मेवा... ! मुंबई, पुणेसारख्या शहरात आपल्याला कोणत्याही पद्धतीचे जेवण एका क्लिक वर उपलब्ध होते; परंतु खरी मजा ही जेवण बनवण्यातच आहे... इंटरनेट, यु-ट्युबच्या जमान्यातदेखील काही महिला पारंपरिक पद्धतीने म्हणजेच एखादं पुस्तक वाचून पदार्थ बनवण्यात रुची ठेवतात आणि म्हणूनच दक्षिण महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती दर्शवणारे पुस्तक गृहिणींच्या भेटीला आलेलं आहे ज्याचं नाव आहे "द कारवार पॅलेट ! "
"द कारवार पॅलेट" या पुस्तकांमध्ये एम जी ग्रुपच्या संचालिका सुधा कामत यांनी दक्षिण महाराष्ट्रातील कारवार संस्कृतीचे दर्शन सुंदररीत्या घडवले आहे. महाराष्ट्राला खूप जुना खाद्यसंस्कृतीचा इतिहास लाभलेला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि त्यांची खाद्यसंस्कृती हे सर्वांच्याच आवडीचे आहे.... "कारवार पद्धतीचे पदार्थ हे जरी अगदी साधे असले तरी त्यातला श्रीमंतपणा हा आपल्याला चाखतानाच कळतो," असे सुधा कामत सांगतात.
कारवार खाद्यसंस्कृती इतर खाद्यसंस्कृतीपेक्षा किंचितशी निराळी आहे. कारवारी पदार्थांमध्ये नारळाचे दूध, सुका मेवा आणि समुद्री मेवा जास्त प्रमाणात वापरल्यामुळे खवय्यांसाठी ही एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नसते. पदार्थांमध्ये वापरले जाणारे मसाले जसे की हळद, हिंग, गरम मसाला, काजू-बदाम पावडर इत्यादी थंडीत आपल्या शरीराला ऊब देतात याच कारणामुळे थंडीच्या मौसमात लोकं कारवारी पद्धतीच्या जेवणाला प्राधान्य देतात. ज्याप्रमाणे कारवारी मांसाहार प्रसिद्ध आहे त्यापेक्षा जास्त शाकाहारी कारवारी पद्धतीचे जेवण प्रसिद्ध आहे. शुभ्र आंबे मोरे भात सोबत दली तोय (वरणाचा प्रकार) मसाले तेलात टाकुन परतवलेल्या भाज्या, भाकरी, उडदाची भाजी अशा प्रकारचं साधं जेवणदेखील मन खुश करून जात... "द कारवार पॅलेट" या पुस्तकामध्ये घरगुती मसाले वापरून १०० पेक्षा जास्त प्रकारच्या कारवार पाककृती कामत यांनी मांडल्या आहेत जी तुम्हाला दक्षिण महाराष्ट्राची खाद्य सफर घडवून आणतील यात मात्र शंकाच नाही !