आयुर्वेदिक प्राचिन ग्रंथांत कांद्याचा उल्लेख नव्हता. तरी पण रोजच्या व्यवहारात गरिबांपासून श्रीमंतापर्यंत, ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा नाना प्रकारच्या चटक-मटक भाज्यांकरिता कांदा हा अत्यावश्यक आहे. नेहमीच्या वापरातील कांदा हा ज्यांना भरपूर श्रमाचे काम आहे व ज्यांच्या पोटाच्या काही तक्रारी नाहीत, त्यांचेकरिता वरदान आहे. कृश व्यक्तींनी योग्य ऋतुत वजन वाढवायचे ठरविले तर कांद्याची मदत जरूर घ्यावी.
कांदा, दही, कडधान्य असे पदाथर आलटून पालटून आहारात ठेवावे. डोळ्याकरिता कांदा फार उपयुक्त आहे, असे जे सांगितले जाते त्याकरिता पेण-पनवेलकडचा विशिष्ट जातीचा पांढरा कांदाच वापरावा. कांदा हा वृष्य किंवा शुक्रवर्धक म्हणून गणला जातो. त्याकरिता कांदे टोचावेत आणि भरपूर मधामध्ये किमान २ ते ३ आठवडे बुडवून ठेवावे. असा बुडवून ठेवलेला १ कांदा रोज खाल्ल्यास गमावलेले पौरुषत्व, ताकद पुन्हा मिळवता येते. डोळ्यात कांद्याचा रस टाकल्यास काही काळ झोंबते पण कफप्रधान चिकटा, घाण, धुरकट दिसणे या तक्रारी तात्पुरत्या कमी होतात.
ज्यावेळेस अकारण एकदम ताप खूप वाढतो व रुग्ण तीव्र औषधे घ्यायला तयार नसतो अशावेळेस कांद्याचा रस तळहात, तळपाय, कानशिले, कपाळ याला चोळावे. तापाचे प्रमाण काही प्रमाणात कमी होते. अपस्मार किंवा फिट्सचे झटके वारंवार येणाºयांकरिता कांदा हुंगवून शुद्धीवर आणण्याचा प्रधान सर्वत्र आहेच. ज्यांनी या विकाराकरिता विविध प्रकारच्या गोळ्यांची सवय लावून घेतलेली आहे, त्यांनी नियमितपणे कांद्याच्या रसाचे नस्य करून पहावयास हरकत नाही.