कोकोच्या फळातील बीन्सपासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थाला कोको म्हणतात. यापासून कोको पेय, चॉकलेट, कोको बटर इ. खाद्यपदार्थ तयार करतात. यातील कोको बटर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. या बटरमध्ये मुबलक प्रमाणात हेल्दी फॅट्स, कोको आणि हाय कॅलरीज असतात. त्यामुळेच हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. कोको बटरमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि इतर अनेक प्रकारचे फॅटी अॅसिड असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही फायदेशीर होते. त्याचबरोबर वजन वाढविण्यासाठीही मदत करतात. याशिवाय सौंदर्य वाढविण्यासाठी कोको बटर फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया कोको बटरच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत...
कोको बटरचे आरोग्यदायी फायदे :
वजन वाढविण्यासाठी
सध्या अनेकांना लठ्ठपणाची समस्या सतावत असते. अशातच बाजारात मिळणाऱ्या औषधांचा आधार घेऊन किंवा वेगवेगळे डाएट फॉलो करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परंतु, अनेक जणांची समस्या याच्या अगदी उलट असते. त्यांचं वजन वाढता वाढतं नसतं. त्यामुळे वजन वाढविण्यासाठी अनेक उपाय करून ते थकलेले असतात. अशातच कोको बटर त्यांना मदत करतं. कोको बटरमध्ये हेल्दी फॅट्स मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे कोको बटर आरोग्याला कोणतीही हानी न पोहोचवता वजन वाढविण्यासाठी मदत करतं. याचे सेवन नाश्त्यामध्ये स्मूदी स्वरूपात करू शकता.
त्वचेसाठी हेल्दी
अनेकदा त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच अनेक उपाय करून थकला असाल तर कोको बटरचा वापर करून पाहा. कोको बटरमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर स्किन डॅमेजपासूनही बचाव करतात.
केसांच्या मजबूतीसाठी
कोको बटरमध्ये हेल्दी फॅट्स आणि अॅन्टी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हे केसांचे आरोग्य चांगले राखण्यासोबतच त्यांना पोषण पुरवण्यासाठीही मदत करतं. त्याचप्रमाणे डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी
कोका बटर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लाभदायक असतं. कोको बटरमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के यांसारखे अॅन्टी-ऑक्सिडंट्स असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात.