पुणे : इडली म्हटली की लहानांपासून मोठ्यांनाही खुश करणारा पदार्थ. तेल कमी लागणारी, पौष्टिक इडली खरं तर पूर्णान्न मानली जाते.दक्षिण भारतीयांचा अन्नपदार्थ मानली जाणारी इडली आता संपूर्ण भारतीयांची आवडती बनली असून जगभरातही खाल्ली जाते. पण प्रत्येकवेळी इडली, सांबार, चटणी खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी पूर्ण जेवणाची जीवनसत्वे देणारी पौष्टिक तिरंगी इडली नक्की ट्राय करा.
साहित्य :
इडलीचे पीठ
पालक
गाजर
आलं, लसूण, कोथिंबीरचे हिरवे वाटण
लाल तिखट
जिरे पूड
मीठ
तेल किंवा तूप
चीज (आवडत असेल तर)
कृती :
- इडलीच्या पीठाचे तीन समान भाग करून तीन वेगवेगळ्या भांड्यात घ्यावेत.
- पहिल्या भागात धुवून अगदी बारीक चिरलेला पालक, मीठ आणि आलं, लसूण, कोथिंबीरचे हिरवे वाटण घालून चमच्याने एकजीव करा.
- दुसऱ्या भागात लाल तिखट (रंगाचे), किसलेले गाजर, मीठ टाकून एकजीव करा.
- तिसऱ्या भागातल्या पिठात मीठ, चमचाभर जिरेपूड आणि किसलेले चीज टाकून मिश्रण हलवून घ्या.
- इडलीच्या भांडयाला तेल किंवा तूप लावून घ्यावे.
- त्यात एक चमचा हिरवे मिश्रण, त्याच्या शेजारी पांढरे मिश्रण आणि शेवटी लाल मिश्रणाचे पीठ घाला. इडलीचे पीठ घट्ट असल्याने आणि त्यात भाज्या असल्याने मिक्स होत नाही.
- अशाच पद्धतीने सर्व इडली पात्र भरून १० ते १२ मिनिटे इडली वाफवून घ्या. गरमागरम चिजी इडल्या तयार. या इडल्या सॉस, चटणी किंवा नुसत्या सुद्धा छान लागतात.
- ही इडली पोटभरीचा आहार म्हणून डब्यात नेता येते. भाज्या भरपूर असल्यामुळे पौष्टिक ठरते.