काही पदार्थ आपण विसरत चाललो आहोत. पोहे, उपमा, मॅगी, थालीपीठाच्या जमान्यात सातूचे पीठ, उकडपेंडी असे घरगुती, चटपटीत आणि पौष्टिक नाष्ट्याचे पदार्थ आता नामशेष होत आहेत. त्यातल्या उकडपेंडीची रेसिपी आज आपल्यासाठी देत आहोत. घरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या सामानातून तयार होणारा हा पदार्थ चवदार तर आहेच पण कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला आवडेल असाच आहे. शक्यतो गव्हाच्या पीठाचा केला जाणारा हा पदार्थ काहीवेळा ज्वारीच्या पीठापासूनही केला जातो. चला तर बघूया कशी करायची उकडपेंडी. साहित्य :
- कणिक 2 वाट्या चाळून घेऊ नये (गव्हाचे पीठ)
- 1 मोठा पेला पाणी (गरम)
- 2 मोठे चमचे तेल
- मोहरी 1 चमचा
- जिरे 2 चमचे
- हळद अर्धा चमचा
- 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या
- मध्यम आकाराचे दोन कांदे
- मिरच्या चार ते पाच
- मीठ चवीनुसार
- आंबट दही 1 वाटी
- कोथिंबीर
- कढीपत्ता
कृती :
- कांदे , हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
- एक मोठा पेला गरम पाणी करायला ठेवा.
- लसूण बारीक चिरून किंवा ठेचून घ्या.
- कढईत कणिक खरपूस आणि गुलाबीसर भाजून घ्या. या पदार्थात कणिक भाजणे महत्त्वाचे आहे. अन्यथा कचवट चव लागते. छान घमघमाट सुटेल अशी कणिक भाजावी. भाजल्यावर ती हलकी होते.
- आता एका कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवा व त्यात मोहरी टाकून तडतडू द्या .
- आता त्यात हिरवी मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता आणि जिरे घाला. कढईत कांदा टाकून गुलाबीसर परतून घ्या.
- कांदा परतल्यावर त्यात मीठ आणि हळद घाला आणि पाण्यात गरम पाणी व दही घाला.
- आता हे सर्व पाणी उकळल्यावर त्यात शेवटी कणिक टाका.
- कणिक बुडाला लागू देऊ नका. उकरपेंडी जाळल्यास कडवट वास लागतो. त्यामुळे गॅस बारीक ठेवावा.
- एक वाफ द्यावी आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावी उकरपेंडी.
- सर्व्ह करताना आवडत असल्यास ओले खोबरेही घालू शकता. दही नसल्यास फोडणीत टोमॅटोचे काप किंवा लिंबू पिळून टाकू शकता.
- पावसाळ्यात उकडपेंडी हा उत्तम पर्याय आहे. तेव्हा नक्की करून बघा आणि आम्हाला प्रतिक्रीया कळवायला विसरू नका.