पुणे : चीज आवडत नाही अशी व्यक्ती मिळणे तसे विरळच. चीज कचोरी, पिझ्झा, सॅन्डविच, उत्तपा सर्वानाच आवडतो. पण चीज पेरिपेरीं डोसा हा असा प्रकार आहे जो चवीला तर क्लास आहेच पण त्यासोबत चटणी किंवा बटाट्याच्या भाजीचीही गरज नाही. पटकन होणारा, भन्नाट चवीचा चीज डोसा खवैय्यांना पुन्हा पुन्हा खावासा वाटेल असाच आहे.
साहित्य :
डोशाचे पीठ
मीठ
चीज स्प्रेड
लाल तिखट
पेरिपेरी मसाला
कोथिंबीर
शेव (आवडत असल्यास)
डोशाचे पीठ : तांदूळ आणि उडीद डाळ दोनास एक प्रमाणात आठ तास भिजत घाला. भिजलेले तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये वाटून एकत्र कालवून ८ ते १२ तास आंबवून घ्या.
कृती :
- तयार डोशाचे पीठ घेऊन त्यात चवीपुरते मीठ घालून एकत्र ढवळून घ्या
- या पीठात वाटीभर पाणी टाकून कढीसारखे पातळ करून घ्या
- नॉनस्टिक तव्याला तेल लावून पातळ डोसा टाका
- डोशाचे पीठ शक्य तितके एकसारखे, गोलाकार, पातळ करा
- त्यावर लाल तिखट आवडीप्रमाणे भुरभुरावा
- पेरीपेरी मसाला आवडेल तेवढा चिमटीने भुरभुरवून एकसारखा टाकावा.हा मसाला बाजारात तयार मिळतो
- त्यावर चीज स्प्रेड टाकून उलथण्याने एकसारखे पसरवून घ्या
- त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका
- या कृतीपर्यंत डोसा तयार झालेला असतो
- डोसा उलटून दोन्ही बाजूने भाजायची गरज नसते. त्यामुळे हलक्या हाताने उलथण्याने काढून ताटात घ्यावा.
- त्यावर आवडत असल्यास शेव भुरभुरवून टाकावी.
- या डोशासोबत कोणत्याही चटणी, सांबार अगर बटाट्याच्या भाजीची गरज नाही. अगदीच आवश्यता वाटल्यास टोमॅटो सॉस घ्यावा.