सर्वचजण पावसाची आतुरतेने वाट पाहात असतात. खिडकीबाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, हातात चहाचा किंवा कॉफीचा कप आणि गरमा गरम भजी..... अरे वा... भारीच बेत. पण अनेकदा कांद्याची किंवा बटाट्याची भजी खाउन कंटाळा येतो. पण दुसरं काही नाही भजीच खायच्या असतात. तुम्ही जर हटके पण हेल्दी भजीच्या शोधात असाल तर तुम्ही मेथीच्या गोटा भजी ट्राय करू शकता.
आपल्याला अनेकदा थोरामोठ्यांकडून हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला मिळतो. पण आपण मात्र पालेभाज्या पाहून नाक तोंड मुरडतो. ताटामध्ये पालेभाजी दिसली की जेवणाचा कंटाळा येतो. मग कारण सांगितली जातात आणि त्यावर घरातल्यांचा ओरडा पडल्याशिवाय राहत नाही. हे सर्व खरं असलं तरीही धावपळीच्या दैनंदिन जीवनात आरोग्य चांगलं राखण्यासाठी डॉक्टरांकडूनही अनेकदा हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देण्यात येतो. अशातच अनेकदा बाजारामध्ये मेथी सर्रास दिसून येते. पण तुम्हाला मेथीची भाजी खाण्याची अजिबातच इच्छा नसेल तर तुम्ही मेथीच्या भजी तयार करून खाऊ शकता. जाणून घेऊया मेथीच्या गोटा भजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती...
साहित्य :
- प्रत्येकी एक वाटी चणा डाळ
- 1 वाटी बारीक चिरलेली मेथी
- पाव वाटी रवा
- पाव वाटी दही
- मीठ
- 2 ते 3 ओल्या मिरच्या
- जिरे अर्धा टी स्पून
- तेल
कृती :
- सर्वात आधी मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून बारिक चिरून घ्या.
- त्यानंतर मिरच्या, आलं, लसूण एकत्र वाटून घ्या.
- बेसन पिठ भिजवून घ्या.
- त्यानंतर सगळं बेसणाच्या पिठामध्ये एकत्र करून घ्या.
- त्यामध्ये जिरं, कोथिंबीर, मीठ आणि रवा घालून एकत्र करा.
- कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये भजी तळून घ्या.
- गरमा गरम भजी खाण्यासाठी तयार आहेत.
- चटणी किंवा सॉससोबत तुम्ही भजी खाऊ शकता.