आजच्या धावपळीच्या जीवनात बदलत्या लाइफस्टाईलमुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्या होत राहतात. भलेही या समस्या गंभीर नसल्या तरी कालांतराने या समस्या डोकं वर काढतात आणि मोठे आजार होतात. अशात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतोच, पण अनेकदा आपल्याला काही पदार्थांबाबत माहिती नसल्यामुळे त्यांपासून होणाऱ्या फायद्यांचा लाभ आपण घेऊ शकत नाही.
खसखशीमध्ये ओमेगा 3 आणि ओमोगा 6 हे तत्व असतात. यासोबतच फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर, थायमिन, कॅल्शिअम आणि मॅगनीज हे सुद्धा असतात. ही सर्वच पोषक तत्व तुम्हाला फिट राहण्यास मदत करतील.
आज आम्ही तुम्हाला अशीच एक आरोग्यदायी रेसिपी सांगणार आहोत. खसखशीची रस्सा भाजी. तुम्ही घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार करू शकता.
खसखस रस्सा भाजी बनवण्यासाठी साहित्य :
- खसखस
- कांदा
- लसूण पाकळ्य़ा
- आलं
- सुक्या खोबऱ्याचा किस
- सुक्या मिरच्या
- धणे
- शाही जीर
- तेजपत्ता
- वेलची
- जाय पत्री
- कसूरी मेथी
- तेल
- मिरची पावडर
- हळद
- मीठ
कृती :
- खसखस 5 ते 6 तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा.
- थोडं तेल टाकून कांदा ,शाही जीरे ,धणे ,लाल मिरच्या, तेज पान, वेलची ,जाय पत्री, सुक्या खोबऱ्याचा किस लालसर भाजू घ्या.
- त्यानंतर सर्व साहित्य आणि आलं-लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी एकत्र करून बारिक वाटून घ्या.
- भिजवलेली खसखस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि मिक्सरमध्ये बारिक करून घ्या.
- कढईमध्ये तेल गरम करून घ्या. त्यामध्ये बारिक चिरलेला कांदा एकत्र करून लालसर परतून घ्या. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये वाटलेला मसाला एकत्र करून त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
- तयार मिश्रणामध्ये कसूरी मेथी एकत्र करून परतून घ्या.
- तयार मिश्रणात पुन्हा पाणी घालून त्यात मिरची पावडर, हळद आणि बारिक केलेली खसखस एकत्र करा.
- मिश्रण एकत्र केल्यानंतर थोडं पाणी एकत्र करून वाफवून घ्या.
- चवीपूरतं मीठ टाका, थोडा लिंबाचा रस एकत्र करून पुन्हा 2 मिनिटांसाठी शिजवून घ्या.
- तुमची खसखशीची खमंग भाजी तयार आहे. गरम गरम सर्व्ह करा खसखशीची रस्सा भाजी.