सारिका पूरकर-गुजराथी2017 ला बाय बाय करून आता दोन आठवडे लोटले. मोठ्या उत्साहात 2018 चं स्वागत करून झालं. तरीही, गतवर्षाच्या धांडोळा, मागोवा आपण सारे घेतच आहोत. फूड जगतातही गतवर्षात ब-याच गोष्टी घडून गेल्या. त्या माहित करून घेतल्या तर आपल्यालाही गंमत वाटेल, आपण खातो म्हणजे नेमके काय करतो? बाजारात , फूड इंडस्ट्रीत या घडामोडी किती महत्वपूर्ण ठरतात, हे देखील समजेल. 2017 हे वर्ष ‘आॅन लाइन फूड आॅर्डर’ नं गाजवलं.
भारतीयांना आॅनलाइन शॉपिंग चांगलेच अंगवळणी पडलं आहे, परंतु आता ‘आॅनलाइन फूड आॅर्डर’ हा ट्रेण्ड भारतात चांगलाच रूजला आहे. ‘स्विगी’ या बंगळुरूतील आॅन लाइन फूड आॅर्डर आणि डिलिव्हरी सेवा देणा-या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, 2017 या वर्षात भारतीयांनी नाश्त्यासाठी मसाला डोसा, स्नॅक्स म्हणून समोसा आणि जेवण म्हणून बिर्याणी या पदार्थांची सर्वात जास्त मागणी केली. हे सर्वेक्षण बंगळुरु , मुंबई, पुणे, हैदराबाद,कोलकाता, चेन्नई, दिल्ली-एनसीआर या मेट्रो शहरांमध्ये करण्यात आलं होतं.
या कंपनीद्वारे आॅनलाइन आॅर्डर करणा-या खवय्यांनी बिर्याणीला सर्वाधिक पसंती दिल्याचंही आढळून आलं. एरवी लहानांपासून थोरांपर्यंत पिझ्झाची आॅनलाईन आॅर्डर करणा-यानी गत वर्षात मात्र पिझ्झाला अनलाइकच केलेलं दिसून आलं. सर्वाधिक आॅर्डर केलेल्या पदार्थांच्या यादीत पहिल्या पाचमध्येही पिझ्झाचा समावेश झालेला नाहीये. विशेष म्हणजे 5 लाख वेळा पिझ्झा इंटरनेट वर शोधला गेला, परंतु, प्रत्यक्षात आॅर्डर मात्र झाला नाही. अन्य पदार्थ, जे सर्वाधिक वेळा सर्फिंग केले गेले त्यात बर्गर्स, केक, मोमोज या पदार्थांचा समावेश होता.
२०१७ मधील टॉप टेन आॅर्डर
1-मोस्ट आॅर्डर्ड डिश -बिर्याणी2- मोस्ट सर्चर्ड ब्रेकफास्ट डिश- मसाला डोसा3- बटर नान4-पनीर बटर मसाला5-इडली,6-दाल माखनी7-चिकन फ्राईड राईस8- समोसा9-पाव भाजी10-चिकन बर्गर