आपण अनेकदा ऐकतो की, नाश्ता आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतो. परंतु धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवस्थित नाश्ता करणं सर्वांनाच शक्य होतं असं नाही. अनेक लोक टोस्ट किंवा ब्रेडवर समाधान मानतात आणि कसबसं तोंडामध्ये कोंबून कामासाठी निघून जातात. मुलं अनेकदा नाश्ता न करताच शाळेत जातात आणि जेवणाचा डब्बाही परत घेऊन येतात. पण तुम्हाला माहीत आहे का? सकाळच्या नाश्त्यामध्ये राहिलेली कमी तुम्ही दुपारच्या जेवणामधून भरून काढू शकता.
जर तुम्ही भूक लागल्यानंतर फक्त चहा-कॉफी किंवा स्नॅक्सवर काम चालवत असाल तर मग तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहात. खरं पाहायला गेलं तर दुपारचं जेवणंच तुमच्या नाश्त्यामधून राहिलेलं पोषण शरीराला देण्यासाठी मदत करत असतं. जाणून घेऊया दुपारच्या जेवणात आवर्जुन समावेश करण्यात येणाऱ्या पदार्थांबाबत जे शरीराला पोषण देण्यासाठी फायदेशीर ठरतात.
असं करा दुपारचं जेवण :
चपाती किंवा भात
दुपारची वेळ शांतपणे जेवण्याची असते. मग तुम्ही घरीच जेवण करा किंवा ऑफिसमध्ये यावेळी तुम्ही तुमचं वजन आणि भूकेनुसार, चपाती किंवा भाताचा समावेश करणं आवश्यक असतं. मुलांसाठी एक किंवा दोन चपात्या आवश्यक असतात, तेच मोठ्या माणसांसाठी दोन ते तीन सामान्य आकाराच्या चपात्या आवश्यक असतात. तुम्हाला आवश्यक असल्यास तुम्ही भाताचाही समावेश करू शकता. तज्ज्ञांच्या सल्यानुसार, चपाती आणि भात दोघांचाही आहारात समावेश करणं आवश्यक असतं जेणेकरून तुम्हाला संपूर्ण पोषण मिळू शकतं.
डाळींचाही करा समावेश
दुपारच्या जेवणामध्ये डाळीचा अवश्य समावेश करा. दुपारच्या वेळी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या डाळीचा आहारात समावेश करू शकता. कारण यावेळी भूकही फार लागते आणि शरीरामध्ये पाचनशक्तीही मुबलक प्रमाणात असते. ज्या डाळींमुळे गॅस किंवा पोटाच्या समस्या उद्भवण्याची भिती आहे. त्या डाळींमध्ये लसूण किंवा हिंग यांसारख्या मसाल्यांचा वापर करा.
हिरव्या पालेभाज्या
हलकीशी फोडणी देऊन तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करू शकता. तुम्हाला आवडत असो किंवा नसो. परंतु हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. ऋतूनुसार येणाऱ्या भाज्या शरीराला आवश्यक ते पोषक घटक देण्यासाठी उत्तम स्त्रोत आहेत.
दही किंवा ताक
दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार दही किंवा ताकाचा समावेश करा. हे पदार्थ शरीरातील मेटाबॉलिज्मची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात.
सलाड ठरतं पौष्टिक
कच्चा कांदा, गाजर, मूळा, काकडी, सलाड यांचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक ते पोषण देण्यासाठी मदत करतं. तुम्हाला आवश्यक असेल तर कच्चा टॉमेटोचाही सलाडमध्ये समावेश करू शकता. तसेच चवीसाठी लिंबू किंवा कोथिंबीर देखील वापरू शकता. हिवाळा असो किंवा उन्हाळा कोणत्याही ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सलाड फायदेशीर ठरतं.