संजय मोने, अभिनेतेखान्देशात एकेकाळी नाटकाचे मस्त दौरे व्हायचे. जळगाव मग धुळे आणि भुसावळ असा दौरा असायचा. उन्हाळ्यात साधारण ४५ च्या आसपास तापमान असायचं. जीवाची तगमग म्हणजे काय ते त्यावेळी कळायचं. तंदुरी रोटीला काय वाटत असेल? याचा अंदाज यायचा. पण कधीकधी थंडीच्या दिवसात प्रयोग असायचे, तेव्हा मजा यायची. खान्देशात जेवण फार चविष्ट असतं शेंगदाण्याचा वापर असतो मसाल्यात..जळगावला माझा एक अत्यंत घनिष्ट मित्र राहायचा. भैय्या उपासनी त्याचं नाव. आता तो नाही. माझ्या आयुष्यात तो अचानक आला. आम्ही दोघे रात्र-रात्र गप्पा मारायचो. साथीला त्याचे एक दोन मित्र, काही उत्तम द्रव्य. शेवभाजी आणि भरीत भाकरी ही त्याने खायला घातली तशी आता पुन्हा मिळाली नाही. बनतही असेल उत्तम, पण आता तो नाही. वांग्यांचे तेलात फोडणी करून तुकडे टाकायचे, दाण्याचे कूट, थोडा काळसर मसाला, मस्त झणझणीत तिखट बरोबर भाकरी.
ज्वारीची उन्हाळ्यात बाजरीची थंडीत... वरती तेल आणि एक अगम्य चटणी. जेवणाच्या ताटात स्वर्ग यायचा. हुरडा-बिरडा हा प्रकार खाण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी पोट बंड करून उठतं म्हणून मला फारसा आवडत नाही. असे इतरही पदार्थ आहेत. तर जळगावचा एक किस्सा. एका नाटकाचा प्रयोग होता. भैय्याच्या घरी सकाळी नेहमीप्रमाणे पोहोचलो. उत्तम जेवण झालं. छानपैकी झोपही झाली. संध्याकाळी प्रयोगाला निघायचं म्हणून आवराआवर केली. अचानक भैय्या म्हणाला, “चल कचोरी खाऊया.” “कुठे?” “इथे जवळच” आम्ही त्याच्या बुलेटवरून कचोरीवाल्याकडे पोचलो. भैय्या पुन्हा एकदा उद्गारला “चेहरा आवडला नाही तर कचोरी देत नाही हां तो” “म्हणजे?” “म्हणजे तू त्याला कुरूप वाटलास तर कचोरी मिळणार नाही”
आरशात आपण नेहमी बघतोच. मला काळजी वाटायला लागली. जर मी त्याला कुरूप वाटलो तर? आणि हे सगळ्यांना कळले तर? नकोच विषाची परीक्षा.
“मला तशी फार भूक नाहीये” टाळायला म्हणून मी म्हणालो.
भैय्या त्याचं नेहमीचं गडगडाटी हास्य करून म्हणाला “आपण कसेही दिसत असलो तरी आपल्याला खायला मिळेल.” भैय्या रुबाबदार त्यामुळे त्याला मिळाली असती कचोरी, प्रश्न माझ्या साजिऱ्या रूपाचा होता. गाडी त्या कचोरीवाल्याकडे थांबली. मस्त कचोरी. धने आणि बडीशेप बेसन घातलेली एकदम हलकी टम्म फुगलेली. त्यावर दोन प्रकारच्या चटण्या आणि दही. एकदम मधुर. कोथिंबीर पेरलेली. थोडा कापलेला कांदा. भसाभस संपवली. पैसे देऊन झाल्यावर भैय्याने ओळख करून दिली. त्यावर तो कचोरीवाला म्हणाला अच्छी सुरात पायी है आपने. कभीभी आजाना! इतकं समाधान कधीही मिळालं नाही. आता माझ्या दिसण्याबद्दल मी निर्धास्त आहे.