- सारिका पूरकर-गुजराथीगणरायांच्या आगमनाची तयारी धूमधडाक्यात सुरू आहे. स्वच्छता, खरेदी सजावट, नैवेद्य अशी सर्व कामं एकाच वेळी सुरू आहेत. सर्व काही व्यवस्थित होतंय पण नैवेद्यामध्ये थोडा वेगळेपणा आणि सोपेपणा हवा आहे असं वाटतय. मग त्यासाठी जास्त शोधाशोध करायला नको आणि त्यासाठी बाजारातल्या आयत्या नैवेद्यांवर तर अजिबात विसंबून राहण्याची गरज नाही. घरच्याघरी नैवेद्याचे वेगळे पदार्थ सहज करता येतात.
लापशी
अत्यंत पौष्टिक आणि करायला सोपा असा हा नैवेद्याचा पदार्थ आहे. मारवाडी बांधव सणावारी हा पदार्थ नेहमीच करतात. बाजारात रेडिमेड गव्हाचा दलिया मिळतो. दलिया म्हणजे भरड दळलेले गहू. हा दलिया साजूक तूपावर चांगला भाजून घेतला जातो. नंतर त्यात गरम पाणी घालून चांगला शिजला की साखर घालून पुन्हा त्यातील पाणी आटेपर्यंत शिजवून वाफवला जातो. मग वेलची पावडर, काजू-बदामाचे काप घातले की लापशी तयार. हीच लापशी आणखी हेल्दी बनवायची असेल तर त्यात केवळ साखरेऐवजी साखर आणि गूळ समप्रमाणात घालता येतो. दलियाचे दाणे मोकळे राहतील इतपत त्यात पाणी घालावं हे महत्त्वाचं.
2) पंचकाज्य
कर्नाटकमधील हा नैवेद्याचा पारंपरिक प्रकार. विशेष करु न गणेश चतुर्थीला तो बनवला जातो. मूगडाळ, हरभरा डाळ, छोले हे विविध घटक वापरु न तो विविध चवीचा बनवला जातो. मूगडाळीचे पंचकाज्य करण्यासाठी मूगडाळ कोरडी गुलाबीसर भाजून थंड करून रवाळ दळली जाते. नंतर किसलेला गूळ,खोवलेलं ओलं खोबरं, काजू-बदामाचे तुकडे घालून एकत्र करु न पाच ते सात मीनिटं मंद आचेवर आटवले की पंचकाज्य तयार होतं. साळीच्या लाह्या बारीक करुनही पंचकाज्य बनवलं जातं. त्याची चवही सुंदर असते. गुळ आणि खोबरे नीट मिक्स करून एकजीव करणं यावर पदार्थाची चव अवलंबून असते.
3 ) खोरक
हा सिंधी बांधवांचा पारंपरिक तसेच पौष्टिक पदार्थ आहे. खाण्याचा डिंक साजूक तूपात भाजून पूड केली जाते. तसेच साजूक तूपातच कणिक गुलाबी भाजली जाते. नंतर कणिक, डिंकाची पूड, वेलची पावडर, काजू-बदाम पावडर, खसखस पावडर, थोडा खोब-याचा किस एकत्र करु न साखरेचा एकतारी पाकात घालून वड्या थापल्या जातात. जैन बांधव देखील या वड्या नैवेद्यासाठी तसेच थंडीतील खुराक म्हणून करतात. त्यास गुंदरपाक म्हणतात. यास शाही चव द्यायची असेल तर यात थोडा खवा घातल्यास चालतो.
4) गूळ पोहे
कोकणात, गोव्यात गूळ पोहे खूप लोकप्रिय आहेत. विविध सणांना नैवेद्यासाठी घरोघरी हे पोहे बनवले जातात. थोडं साहित्यात आणि झटपट होणारा असा हा नैवेद्याचा पदार्थ आहे. जाड पोहे धुवून निथळून घेतले जातात. नंतर किसलेला गूळ, खोवलेलं ओलं खोबरं, चवीला मीठ आणि पाव वाटी पाणी घालून उकळलं की त्यात पोहे घालून वाफ काढली जाते. पाणी आटून सणसणीत वाफ आली की पोहे तयार होतात. वरु न साजूक तूप घालून नैवेद्याला ठेवले जातात.
5) कोसंबिरी
खूप गोडाचे नैवेद्य खाऊन गणरायाला देखील वैताग येईल, थोडी चटक-मटक चव हवी असेल तर कोसंबिरी खूप छान पर्याय आहे. आंध्रप्रदेशातील हा पारंपरिक नैवेद्याचा पदार्थ कमी तेलाचा, झटपट होणारा आणि तरीही भरपूर पौष्टिक असा आहे. यासाठी पिवळी मूगडाळ धुवून दोन तास भिजवून पूर्ण निथळून घेतली जाते. डाळ निथळली की त्यात बारीक चिरलेली काकडी, कोथिंबीर,खोवलेलं ओलं खोबरं, मीठ घालून मिक्स करून जिरे-मोहरी,हिंग-कढीपत्त्याची फोडणी वरुन घातली जाते. वरुन लिंबू पिळला की झाला कोसंबिरीचा पौष्टिक नैवेद्य तयार.गणरायासाठी हे हेल्दी आणि वेगळ्या चवीचे नैवेद्य नक्की ट्राय करा.. आरतीच्या वेळी प्रसादासाठीची उत्सुकता, गंमत काही औरच असेल यात शंका नाही..