पुणे : पुण्याची स्पेशालिटी म्हटली की अनेकांना आठवते ती बाकरवडी, पुणेरी मिसळ. पण त्याही पलीकडे जात पुण्यात केला जाणारा पदार्थ म्हणजे मटार उसळ. आजही थंडीत ओले वाटणे (मटार) बाजारात आल्यावर पुण्यात घरोघरी मटार उसळ केली जाते. गोडसर मटार आणि त्याला लावलेले ओल्या खोबऱ्याचे वाटण म्हणजे पहिल्याच घासाला सुखाचा अनुभव आहे. तेव्हा ही मटार उसळ घरी नक्की करून बघा.
साहित्य :
- ताजे मटार पावशेर (फ्रोजनही चालतील मात्र वाटाणे नकोत)
- ओलं खोबरं एक वाटी
- कढीपत्ता चार ते पाच पाने '
- लसूण २ पाकळ्या
- कोथिंबीर एक वाटी
- मिरच्या तीन ते चार
- हळद
- हिंग
- मीठ
- तेल
- लिंबू अर्धे किंवा दोन आमसुले किंवा कोकम
- साखर
कृती :
- मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचा किस, लसूण, पाऊण वाटी कोथिंबीर, मिरच्यांचे तुकडे एकत्र करून वाटण करून घ्या.
- कढईत तेल तापवून घ्या.
- त्यात मोहरी तडतडवून घ्या. मोहरीनंतर जिरे घाला. यात चार ते पाच कढीपत्त्याची पाने घाला.
- आता यात ओल्या नारळाचे मिश्रण घालून एकजीव करा.
- मिश्रण तेलात परतताना त्यात हळद, हिंग घाला.
- व्यवस्थित परतून झाल्यावर त्यात मटारचे दाणे घालून परता.
- आता या मिश्रणात पाणी घालून उकळी काढा.
- ५ ते सात मिनिटात मटार छान मऊ शिजतात.
- उकळी आल्यावर मीठ घाला, अर्धा चमचा साखर घालून लिंबाचे चार ते पाच थेंब घालून भाजी हलवून घ्या.
- लिंबू वापरायचे नसेल तर दोन आमसुलं वापरा.
- आता उरलेली पाव वाटी कोथिंबीर आणि ओल्या नारळाच्या किसाने सजवून सर्व्ह करा मटार उसळ
- ही उसळ भाजी, भात, रोटीसोबत उत्तम लागतेच पण ब्रेडसोबतही भन्नाट लागते.