'आलेपाक घ्या... आलेपाक', अशी हाक आली की, आम्ही आईकडे पळत जाऊन पैसे घ्यायचो आणि आलेपाकवाल्या आजोबांकडून एक आलेपाकची वडी विकत घ्यायचो. ती तिखट गोड वडी जीभेवर ठेवताच विरघळून जायची आणि तिची चव बराच वेळ तशीच राहायची. आलेपाक म्हणजे आल्याची वडी असंही म्हणता येईल. यामध्ये प्रामुख्याने वापरण्यात येणारा पदार्थ म्हणजे आलं. आलं हे आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतं. कफनाशक आणि पित्तनाशक असलेलं आलं पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयोगी ठरतं. थंडीत तर आलेपाक खाण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही आलेपाक अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता. जाणून घेऊया आलेपाक तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- साल काढलेल्या आल्याचे तुकडे 1 कप
- दोन कप साखर
- अर्धा कप दूध
- तूप
कृती :
- आलं अगदी थोड्या पाण्यामध्ये मिक्सरवर जाडसर वाटून घ्या.
- एका ताटाला तूप लावून घ्या.
- एका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करून त्यामध्ये आलं, साखर आणि दूध एकत्र करा.
- मध्यम आचेवर मिश्रण शिजवून घ्या. हळूहळू साखर वितळून मिश्रण घट्ट होऊ लागेल.
- मिश्रण ताटामध्ये घेऊन ते व्यवस्थित पसरवून घ्या.
- मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्या.
- तिखट-गोड लागणाऱ्या आल्याच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत.