सत्यनारायणाच्या पुजेसाठी आवर्जुन करण्यात येणाऱ्या रव्याच्या प्रसादाची चवच भारी असते. घरी एखादा समारंभ असो किंवा एखादा सण. रव्याचा शिरा सर्रास करण्यात येतो. मऊ लुसलुशीत शिरा खाण्यासाठी चवदार आणि पौष्टीक असतो. याव्यतिरिक्त अनेक पदार्थांपासून शिरा तयार करण्यात येतो. पण तुम्ही कधी उकडलेल्या बटाट्याचा शिरा ऐकलयं का? गोंधळलात ना. अहो अनेक ठिकाणी उकडलेल्या बटाट्याचा शिरा करण्यात येतो. खाण्यासाठी पौष्टीक असलेला हा शिरा आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. विशेष म्हणजे हा शिरा उपवासासाठीही तुम्ही खाऊ शकता. जाणून घेऊया उकडलेल्या बटाट्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या शिऱ्याची रेसिपी.
साहित्य :
- 4 ते 5 उकडलेले बटाटे
- साखर
- साजूक तूप
- दूध
- ड्रायफ्रुट्स
कृती :
- बटाटे धुवून उकडण्यासाठी ठेवा.
- उकडल्यानंतर बटाट्यांची साल काढून स्मॅश करा.
- एका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करा.
- तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये उकडून स्मॅश केलेला बटाटा खरपूस होईपर्यंत परतून घ्या.
- आवश्यक असल्यास वरून तूप घाला.
- बटाटा चांगला खरपूस भाजला की त्याला तूप सुटू लागतं. त्यानंतर थोडसं दूध घालून एक वाफ काढून घ्या. आवश्यकतेनुसार दूधाचा वापर करा.
- मिश्रण नीट एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये साखर एकत्र करा.
- साखर थोडीशीच टाका, कारण बटाट्यामध्ये साखर असते.
- साखर नीट विरघळून मिश्रण एकजीव झालं की, वरून ड्रायफ्रुट्स घालून सर्व्ह करा उकडलेल्या बटाट्याचा शिरा.