सकाळी अनेकदा मुलांना शाळेत पाठवण्याची धावपळ सुरू असते. त्यामध्ये अनेकदा डब्याला काय द्यायचं हा अनेक महिलांना पडणारा कॉमन प्रश्न असतो. रोजच्या पदार्थाना मुलं वैतागतात आणि बऱ्याचदा डब्बा तसाच घरी मागे येतो. अशावेळी सहज आणि पटकन तयार करता येतील असे पदार्थ ट्राय करणं हा उत्तम पर्याय असतो. जाणून घेऊयात घरच्या घरी अगदी सहज तयार करता येणाऱ्या चीज पराठाची रेसिपी.
साहित्य –
- १ कप मैदा
- १ कप कणिक
- ६ चमचे डालड्याचे मोहन
- पाव कप किसलेले चीज
- १ लहानसा फ्लॉवर
- १ गाजर
- १ वाटी मटारचे दाणे
- १ कांदा
- ३-४ हिरव्या मिरच्या
- लहानसा आल्याचा तुकडा
- २-४ लसूण पाकळ्या
- पुदिना
- कोथिंबीर
कृती –
प्रथम सर्व भाज्या किसून घ्या.
मटारचे दाणे आणि भाज्या थोडं मीठ घातलेल्या पाण्यात वाफवून घ्या.
नंतर सर्व मिश्रण घोटून घ्या, त्यामध्ये पाणी अजिबात राहू देऊ नका.
त्यानंतर त्यात मीठ, मिरच्या, आले, लसूण, पुदिना वगैरे घालून मिश्रण ढवळून घ्या आणि त्यामध्ये
चीज मिक्स करा. मिश्रण थंड होऊ द्या.
पिठात थोडे मीठ व मोहन घालून पोळ्यांच्या कणकेसारखी कणिक भिजवून घ्या.
फुलक्याच्या आकाराच्या दोन पोळ्या करून त्यामधे सारण पसरवा.
दुसरी पोळी त्यावर टाकून वरून थोडं लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्या.
कडेने तूप सोडा. उलटताना फार जपून, बेताने उलटावा.
हा पराठा चवीला फारच सुंदर लागतो.