(Image Credit : Kale and Caramel)
हिवाळ्यात आरोग्यासाठी सूप अत्यंत फायदेशीर ठरतं आणि त्यात हे सुप घरी तयार केलेलं असेल तर त्याची बातच काही और... हिवाळ्यात शरीराल ऊब देणाऱ्या पदार्थांसोबतच काही आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही देण्यात येतो. अशातच आहारात सुप घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. अशातच जर तुम्ही मिक्स हिरव्या पालेभाज्यांचे सुप घेतलंत तर आरोग्यासाठी उत्तमच. हिरव्या पालेभाज्यांमध्येच महत्त्वाचे पोषक घटक असतात जे शरीराच्या वाढिसाठी उपयुक्त ठरतात. पालेभाज्यांमधील पोषक घटकांमुळे अनेक आरोग्याच्या समस्याही दूर होतात.
साहित्य :
- 2 कप पालेभाज्या (तुमच्या सोयीनुसार उपलब्ध होतील त्या)
- 2 चमचे बटर
- बारिक चिरलेला लसूण
- एक बारिक चिरलेला कांदा
- अर्धा चमचा मिरचीची पेस्ट
- 2 ते 3 चमचे क्रिम
- चिमुटभर दालचिनी
- चवीनुसार मीठ
कृती :
- मिक्स पालेभाज्यांचे सूप तयार करण्यासाठी सर्वात आधी पालेभाज्या निवडून घ्याव्या.
- एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडं मीठ घालावं.
- पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये निवडलेल्या भाज्या टाकून 2 ते 4 मिनिटं उकळून घ्यावं. भाज्या चाळणीत काढून त्यातील पाणी काढून घ्यावे आणि मिक्सरमध्ये वाटून बारिक पेस्ट तयार करावी.
- गॅसवर एक कढई गरम करून त्यामध्ये बटर वितळून घ्यावे. वितळलेल्या बटरवर बारिक चिरलेला लसूण परतून घ्यावा.
- लसूण थोडा गुलाबी झाल्यावर त्यावर बारिक चिरलेला कांदा घालून पालेभाज्यांची प्युरी घालावी आणि गरजेप्रमाणे पाणी ओतून मिश्रण एकत्र करावे.
- तयार मिश्रणात मीठ, मिरचीची पेस्ट एकत्र करावं. 5 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्यावं. दालचिनी पावडर आणि मिरपूड घालून मिश्रण एकत्र करावं.
- गरमा गरम मिक्स पालेभाज्यांचे सूप खाण्यासाठी तयार आहे.