मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं? हा सर्वांना पडलेला कॉमन प्रश्न. अनेकदा मुलं फार हट्टीपणा करतात. ही भाजी नको किंवा हे का दिलं? मी नाही खाणार... आणि शाळेतून येताना डब्बा तसाच परत घेऊन येतात. अशातच आज आम्ही तुम्हाला एक पदार्थ सांगणार आहोत. हा पदार्थ मुलांना डब्यात देण्यासाठी उत्तम ठरेल. आज आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही मुलांसाठी गाजर गुलकंद बॉल्स तयार करू शकता. फक्त मुलचं नाहीतर घरातील इतर व्यक्तींनाही हा पदार्थ फार आवडेल. जाणून घेऊया गाजर गुलकंद बॉल्स तयार करण्याची रेसिपी....
साहित्य :
- गाजर
- तूप
- मावा
- किसलेलं खोबरं
- गूळ
- गुलकंद
- वेलचीपूड
- ड्रायफ्रूट्स
- मीठ
कृती :
- पाव किलो गाजर स्वच्छ धुऊन किसून घ्यावी.
- कढईत 2 चमचे साजूक तुप घालून त्यावर 50 ग्रॅम मावा परतून प्लेटमध्ये काढून घ्यावा.
- कढईत गाजराचा किस मध्यम लालसर होईपर्यंत परतावा व त्यातच पाव वाटी किसलेले खोबरे परतावे.
- त्यात परतलेला मावा, पाव वाटी पावडर गूळ, पाव वाटी गुलकंद, 1 मोठा चमचा वेलचीपूड, किसलेले ड्रायफ्रूट्स व दोन चिमूट मीठ घालून सुके होईपर्यंत परतावे.
- मिश्रण थाळीत काढून थोडं थंड होताच त्याचे बॉल्स करावे.
- मुलांना हे पौष्टिक ' गाजर गुलकंद बॉल्स' डब्यात देऊन तर बघा मुलं डब्बा फस्त करणारच.
- तुषार प्रीती देशमुख, (लेखक प्रसिद्ध शेफ आहेत.)