पुणे : कोल्हापूर म्हटलं की जसा तांबडा-पांढरा रस्सा आठवतो तसाच आठवतो तो अख्खा मसूर. कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड भागात मिळणारा हा पदार्थ सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. ढाब्यावर जाऊन खास मसूर आणि रोटी खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जाते. पण हा मसूर घरी बनवणेही अत्यंत सोपे आहे. एकदा खाल्ल्यावर जिभेवर रेंगाळणारा हा अख्खा मसूर बनवा आणि घरच्यांना खुश करा.
साहित्य :(चार माणसांसाठी)एक वाटी संपूर्ण किंवा अख्खी मसूर डाळ (काळ्या रंगाची)दोन टोमॅटोदोन कांदे लसूण पाकळ्या पाच ते सहा कांदा लसूण मसाला दोन लहान चमचे 'तिखट एक चमचा मोहरी हळद मीठ तेल कोथिंबीर सजावटीकरिता
पूर्वतयारी :मसूर डाळ दोन वेळा पाण्यात स्वच्छ धुवून सहा ते सात तास भिजवून घ्या.
कृती :
- भिजवून घेतलेली मसुर डाळ मीठ आणि पाणी घालून दोन शिट्ट्या घेऊन कुकरमध्ये शिजवून घ्या.
- कढईत तेल गरम त्यात मोहरी तडतडून घ्या. त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाका.
- त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून एकजीव होईपर्यंत परतून घ्या.
- कांदा,टोमॅटो शिजून मऊ झाल्यावर त्यात एक चमचा तिखट, दोन चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद आणि मीठ घालून एकत्र करा.
- आता या मिश्रणात शिजवलेली मसूर डाळ घाला. या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घाला.
- हा रस्सा फार पातळ न करता दाटसर ठेवावा.
- एक उकळी आल्यावर कोथिंबीर घालून गरमागरम अख्खा सर्व्ह करा.
- हा रस्सा पोळी,भाकरी, रोटी, भात किंवा ब्रेडसोबत अफलातून लागतो.