पुणे : शेवभाजी म्हटलं की आठवतो तो ढाबा...लालजर्द शेवभाजी आणि सोबत कडक तंदुरी रोटी म्हणजे तोंडाला पाणी सुटणारा प्रकार.पण ही शेवभाजी प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने केली जाते.विशेषतः पंजाबी शेवभाजी हॉटेलमध्ये मिळते. मात्र या चवीच्या पलीकडे जात महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार, धुळे अर्थात खान्देश भागात विशेष चवीची शेवभाजी केली जाते.लाल ऐवजी काळ्या रश्श्यात केली जाणारी ही भाजी म्हणजे मेजवानीची राणी आहे. तेव्हा अस्सल महाराष्ट्रीयन चवीची 'अशी शेवभाजी' नक्की करा.
मसाल्यासाठी साहित्य :दोन मध्यम कांदे 'सुक्या खोबऱ्याची वाटी एक लसूण आठ ते दहा पाकळ्या आलं मिरे, लवंग : प्रत्येकी सहा ते सात तमालपत्र दोन पानं बादलफूल एक लहान
भाजीसाठी साहित्य :जाड शेव कोथिंबीर तेल मोहरी लाल तिखट मीठ
कृती :
कांदा उभा चिरून तेलात खरपूस परतून घ्या.
कांदा बाजूला काढून त्याच भांड्यात किसलेले खोबरे रंग काळसर भाजा. खोबरे बाजूला करून थोडयाशा तेलात सर्व खडा मसाला परतून घ्या. हा सर्व पदार्थ गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. वाटताना थोडेसे पाणी घालण्यास हरकत नाही. एका मोठ्या काढईत तेल घेऊन त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर त्यात मसाला घालून परतून घ्या. त्यात लाल तिखट आणि हळद घाला. एक उकळी आल्यावर चवीपुरते मीठ घालावे. मीठ कमी घालावे कारण शेवेत मीठ असतेच. रस्सा पातळ करावा कारण शेव घातल्यावर घट्टपणा येतो. खाण्याची आधी रस्सा एकदा गरम करून त्यात शेव घालून सर्व्ह करा. सजावटीसाठी कोथिंबीर घाला. ही भाजी भाकरी, भात, रोटी, पोळी किंवा ब्रेडसोबत खाता येते.