सध्याच्या अल्हाददायी वातावरणात भजी खाण्याची इच्छा होणार नाही, असं शक्यच नाही. अशातच दररोजच्या कांदा-बटाट्याच्या भजी खाऊन कंटाळा आलेला असतो. भजी खायच्या तर असतात, पण नवीन काहीतरी ट्राय करायचं असतं. अशातच आज आम्ही तुम्हाला हटके आणि हेल्दी रेसिपी सांगणार आहोत.
अनेक भाज्या अशा असतात की, ज्यांची नावं ऐकताच खाण्याची सोडाच पण चाखण्याची इच्छाच होत नाही. पण याच भाज्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. अशीच एक भाजी म्हणजे, दोडक्याची भाजी. घरात या भाजीचं नाव जरी घेतलं तरी सर्वांच्या चेहऱ्यावर बारा वाजतात. पण हिच भाजी थोड्याशा वेगळ्या अंदाजात प्लेटमध्ये सर्व्ह केली तर... म्हणजेच, दोडक्याच्या भाजीऐवजी जर दोडक्याच्या भजी ट्राय केल्या तर? जाणून घेऊया दोडक्याच्या भजी तयार करण्याची रेसिपी...
दोडक्याच्या भजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- 3 ते 4 मध्यम आकाराची दोडकी
- बेसन
- हिंग
- जिरे
- लिंबाचा रस
- मीठ चवीनुसार
- तिखट
- हळद
- बारिक चिरलेली कोथिंबीर
दोडक्याच्या भजी तयार करण्याची कृती :
- दोडकी स्वच्छ धुवून बारीक गोलाकार फोडी करुन घ्या.
- बेसन नीट भिजवून घ्या.
- त्यात सर्व पदार्थ एकत्र करावेत.
- लिंबू रस एकत्र करून मिश्रण व्यवस्थित एकजीव करावं.
- तेल गरम करत ठेवावे. या पिठात कांदा भजी जशी तळतो तशी तळावीत.
- गरमा गरम दोडक्याच्या भजी तयार आहेत.
- पुदिन्याच्या चटणीसोबत भजी सर्व्ह करू शकता.