पुणे : पनीर टिक्का म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत. हॉटेलमध्ये गेल्यावर पनीर टिक्का आणि रोटी ही अनेकांची पहिली पसंती असते. पण अनेकांची तक्रार असते की हॉटेलसारखा पनीर टिक्का मसाला घरी होत नाही. पण आता काळजीची गरज नाही. आम्ही देत आहोत अशी रेसिपी की तुमच्या घरचे एकदम खुश होऊन जातील. तेव्हा या वीकएंडला नक्की ट्राय करायला विसरू नका.
साहित्य :
- फ्रेश पनीर २०० ग्राम
- कांदे दोन मोठे
- टोमॅटो तीन
- सिमला मिरच्या दोन
- बेसन पीठ एक मोठा चमचा
- फ्रेश दही अर्धी वाटी (फार आंबट नको)
- आलं, लसूण पेस्ट दोन चमचे
- हिंग
- हळद
- धने-जिरे पावडर दोन चमचे
- लाल तिखट (काश्मिरी)
- कोथिंबीर
- एका लिंबाचा रस
- कसुरी मेथी एक चमचा
- किचन किंग मसाला एक लहान चमचा
- गरम मसाला एक लहान चमचा
- मीठ
- तेल
- पाणी दोन वाट्या
कृती :
- पहिल्यांदा पनीरचे चौकोनी क्यूब करून घ्या.
- आता एका बाऊलमध्ये पनीरवर, सिमला मिरचीचे चौकोनी काप, आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, एक लहान चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, एक चमचा धने जिरे पावडर, चवीपुरते मीठ, लिंबाचा रस आणि चार मोठे चमचे दही एकत्र करून मॅरीनेट करा.
- हे पनीर फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून द्या.
- आता पॅनमध्ये चार चमचे तेल घेऊन हे सर्व मिश्रण फ्राय करून घ्या. साधारण तीन ते चार मिनिटात मिश्रण शिजून तयार होते. यात कुठेही पाणी वापरू नका.
- मिश्रण जळले तर संपूर्ण भाजीला वास लागू शकतो त्यामुळे खबरदारी घेऊन फ्राय करावे.
- आता ग्रेव्हीसाठी कढईत ४ छोटे चमचे तेल घाला. त्यात १ टी स्पून जिर टाका.
- त्यात हिंग, मग बारीक २ चिरलेले कांदे घाला. कांदा गुलाबी झाल्यावर एक लहान चमचा आलं लसूण पेस्ट टाका.
- आता त्यात ३ छोटे टोमॅटो ची प्युरी घाला. (बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकू शकता) व छान परतून घ्या. पॅनवर झाकण लावून मंद आचेवर थोडा वेळ शिजवा.
- झाकण काढून धणे, जिरे पावडर, हळद, चवीपुरते मीठ, कसुरी मेथी हातावर चोळून टाका, दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घाला.
- हे सर्व मसाले एकजीव झाल्यावर अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून झाकण ठेवा. दोन मिनिटांनंतर झाकण काढून हा मसाला तेल सुटून एकजीव होईपर्यंत परता.
- आता तयार मिश्रणात पनीर टाका आणि वरून एक छोटा चमचा गरम मसाला टाका. सर्व साहित्य एकत्र परतून घ्या आणि त्यात एक कप गरम पाणी टाका. भाजीला उकळी आली की गॅस बंद करा आणि वरून कोथिंबीर भुरभरवून सर्व्ह करा पनीर टिक्का मसाला.
- ही भाजी पोळी, रोटी,नान, कुलचा, जीरा राईस सोबत छान लागते.