सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचा, काय खायचं? या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये सर्वात वरती नावं असतात ती म्हणजे साउथ इंडियन पदार्थांची. रवा डोसा हा त्याच साउथ इंडियन रेसिपीपैकी एक सर्वात लोकप्रिय रेसिपी. हा डोसा रवा आणि तांदळापासून तयार केला जातो. सांबार किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करण्यात येतो. या रेसिपीची सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला पाहिजे तसे बदल करू शकता. घरच्या घरी अगदी सहज तुम्ही रवा डोसा तयार करू शकता. जाणून घेऊयात रवा डोसा तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- 1 कप रवा
- ½ कप मैदा
- ¼ कप ताक
- ¼ टीस्पून काळी मिरी
- 2 टेबलस्पून तेल
- मीठ चवीनुसार
- 1 कप तांदळाचे पीठ
- 2 ¾ कप पाणी
- 1 हिरवी मिरची
- 4 कढिपत्ता
- बारिक चिरलेली कोथिंबीर
कृती :
- एक कप रवा, ताक आणि पाणी एकत्र करून घ्या. हे मिश्रण 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
- एका बाउलमध्ये तांदळाचे पीठ, काळी मिरी, मीठ, आलं, कापलेले कढिपत्ते आणि रव्याचे मिश्रण टाकून एकत्र करा. यामध्ये थोडं थोडं पाणी एकत्र करून डोसा बॅटर तयार करा. गरज असल्यास हिरवी मिरचीदेखील टाकू शकता.
- डोश्याचा तवा किंवा नॉनस्टिक तवा गॅसवर मंद आचेवर ठेवा. त्यानंतर थोडं तेल किंवा बटर टाकून तव्यावर डोसा बॅटर टाकून डोसा तयार करा.
- डोश्याच्या किनाऱ्यावर थोडं तेल किंवा बटर टाका. थोड्या वेळाने डोसा तव्यावर उलटा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजल्यानंतर गरमागरम डोसा तयार आहे.
- खोबऱ्याची चटणी किंवा सांबारसोबत तुम्ही कुरकुरीत रवा डोसा सर्व्ह करू शकता.