हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर सूप म्हटलं की, सर्वात पहिली पसंती मिळते ती म्हणजे स्विट कॉर्न सूपला. स्विट कॉर्न सूप ही एक ऑथेन्टिक चायनिज रेसिपी आहे. तरीही ती फक्त चीनपुरतीच मर्यादित न राहता ते जगभरात लोकप्रिय झालं आहे. तुम्ही या सूपचा लंच किंवा डिनरमध्ये समावेश करू शकता. त्याप्रमाणे आजारी माणसासाठीही हे सुप फायदेशीर ठरतं. तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तरीदेखील हे सूप तुम्हाला मदत करतं. जाणून घेऊयात हे टेस्टी आणि हेल्दी सूप तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- 200 ग्रॅम स्विट कॉर्न
- मीठ चवीनुसार
- एक वाटी कांद्याची पात
- 5 कप भाज्या उकडण्यासाठी वापरलेलं पाणी (व्हेज स्टॉक)
- काळी मिरी पावडर
- 1 ½ कप व्हाइट सॉस
कृती :
- कॉर्न धुवून ते सुकवून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. जास्त बारिक करू नका. थोडसं जाडसरचं ठेवा.
- एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा. त्यामध्ये व्हेजिटेबल्स स्टॉक गरम करत ठेवा.
- त्यामध्ये ग्राइंड केलेले कॉर्न आणि व्हाइट सॉस एकत्र करा.
- जर तुम्हाला सूप थोडं क्रिमी तयार करायचं असेल तर त्यामध्ये थोडी फ्रेश क्रिम मिक्स करा. - सूप मध्यम आचेवर उकळून घ्या.
- मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून एकत्र करा.
- गरमगरम सूप तयार आहे. बाउलमध्ये काढून वरून कांद्याची पात टाका.