पुणे : कारले म्हटले की लहानांपासून मोठेही नाक मुरडतात. पण आरोग्यासाठी प्रचंड हितकर असलेल्या कारल्याची भाजी आवर्जून खावी असे आहारतज्ज्ञ सांगतात. कडू चव असूनही कारल्याची भाजी चवदार बनवणे शक्य आहे. तेव्हा अशी बनवा चवदार आणि पौष्टिक कारल्याची भाजी.
साहित्य :
- कारले पाच ते सहा (हिरव्यागार रंगाची आणि मध्यम आकाराची कारली निवडावीत, ती कमी कडू असतात)
- चिंचेचा कोळ पाव वाटी
- गुळ पाव वाटी
- चिरलेला कांदा एक वाटी
- लसूण पाच ते सहा पाकळ्या
- लाल तिखट
- गोडा मसाला
- हळद
- मीठ
- कोथिंबीर
- तेल
कृती :
- कारल्याच्या आतील बिया काढून गोल चकत्या करून घ्या.
- एका भांड्यात या चकत्या घेऊन त्यांना चमचाभर मीठ चोळून घ्या.
- आता मीठामुळे सुटलेले पाणी काढून टाका.
- उकळत्या पाण्यात या चकत्या सात ते आठ मिनिटे शिजवून पाणी काढून टाका.
- दुसऱ्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी ताड्ताडवून घ्या.
- त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या आणि कांदा गुलाबीसर परतवून घ्या.
- कांद्याचा रंग बदलल्यावर त्यात तिखट,गोडा मसाला आणि कारल्याच्या चकत्या टाकून एकजीव करा.
- त्यात चिंचेचा कोळ, गुळ घालून एकजीव करा.
- त्यात वाटीभर पाणी घालून शिजवा आणि थोडा रस्सा शिल्लक असताना गॅस बंद करा.
- कोथिंबीर घालून गरमागरम भाजी सर्व्ह करा.