पुणे : पूर्वी लग्नाचा मेन्यू म्हटलं की मसाले भात, जिलेबी आणि मठ्ठा अगदी हमखास असायचे. हल्ली लग्नाच्या मेन्यूमध्येही मोठे वैविध्य आढळते. पण अजूनही लग्नमंडपात शिरलं की भूक चाळवणारा मसाले भात सगळ्यांना हवाहवासा वाटतो. आता असा मसालेभात घरीही बनवता येऊ शकतो. आम्ही देतो त्या कृतीचा मसालेभात बनवा आणि घरच्यांनाही खुश करा.
साहित्य :
- तांदूळ दोन वाटी (आवडतील ते घ्यावेत, शक्यतो लांबट)
- पाणी चार वाटी
- हिरव्या मिरच्या दोन
- मीठ
- हळद
- तेल
- मोहरी
- मटार
- तोंडली पाच ते सहा
- आल्याचा किस अर्धा चमचा
- लसूण छेचलेला दोन पाकळ्या
- कोथिंबीर
- कढीपत्ता चार ते पाच पाने
मसाल्याचे साहित्य :
- मिरे सात ते आठ
- लवंगा सात ते आठ
- तमालपत्र ४ पाने
मसाल्याची कृती :
- मंद आचेवर मिरे, लवंगा भाजून घ्या.
- त्यात तमालपत्राची पाने तोडून टाका आणि हे सगळे पदार्थ मिक्सरवर पावडर स्वरूपात बारीक करा.
- आता तयार पावडर गाळणीने गाळून घ्या.
भाताची कृती :
- तांदूळ धुवून निथळत ठेवा.
- तेल गरम करून त्यात मोहरी तडतडवून घ्या.
- त्यात आलं, लसूण, कढीपत्त्याची पाने परतून टाका.
- आता त्यात मटार आणि उभे चिरलेल्या तोंडलीचे तुकडे टाकून फोडणी हलवा.
- या फोडणीत मिरच्या, अर्धा चमचा हळद घाला.
- त्यावर तांदूळ घाला आणि छान परतून घ्या.
- आता त्यात चमचाभर मसालेभाताचा मसाला घाला.
- हे त्यात मीठ घालून सलग परता. तांदूळ कुकरला चिकटणार नाही याची दक्षता घ्या.
- छान सुवास सुटल्यावर त्यात पावणेचार वाटी पाणी घाला.
- आता हे झाकण न लावता जरासे पाणी आटू द्या
- सगळ्यात शेवटी झाकण लावून दोन शिट्ट्या घ्या आणि गॅस बंद करा.
- वाफेवर भात शिजू द्या.
- कुकरची वाफ गेल्यावर कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याने सजवून आणि साजूक तूप टाकून सर्व्ह करा मसालेभात.
- आवडत असल्यास काजूही तळून टाकू शकता.