केक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो कोणत्याही प्रकारचा केक असो जोपर्यंत तो संपत नाही तोपर्यंत मन शांत होत नाही. अनेकदा हा केक तयार करण्यासाठी घरी खटाटोप करण्यात येतो परंतु प्रत्येकवेळी प्रयत्न फसतो. मग केक खाण्याची हौस बाजारातून विकत आणूनच भागवावी लागते. तुम्हालाही घरी केक तयार करण्याची हौस असेल तर आज जाणून घेऊया घरच्या घरी रवा केक तयार करण्याची रेसिपी. ही सहज सोपी रेसिपी तुम्ही घरी तयार करू शकता. ही एक साउथ इंडियन रेसिपी असून रवा, दही, दूध आणि साखरेपासून हा केक तयार करण्यात येतो.
साहित्य :
- रवा अर्धा कप
- वनस्पती तेल पाऊण कप
- बेकिंग सोडा पाऊण टीस्पून
- 2 टीस्पून टूटीफ्रुटी
- साखर ¾ कप
- बेकिंग पावडर अर्धा टीस्पून
- मीठ चवीनुसार
- 2 कप पाणी
- दही अर्धा कप
- दूध ¾ कप
कृती :
- सर्वात आधी एका बाउलमध्ये रवा, दही, साखर, दूध, वनस्पती तेल आणि वेकिंग सोडा एकत्र करून घ्या. तयार बॅटर 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
- एका भांड्याला वनस्पती तेल लावून घ्या. 2 कप पाणी प्रेशर कूकरमध्ये गरम करून घ्या.
- बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि टूटी-फ्रुटी तयार बॅटरमध्ये मिक्स करा. भांड्यामध्ये तयार बॅटर ओता. चमच्याच्या सहाय्याने बॅटर एकसमान पसरवा. त्यावर टूटी-फ्रुटी टाका.
- त्यानंतर भांडे प्रेशर कुकरच्या मधोमध स्टँडवर ठेवा. त्याआधी खात्री करून घ्या की, कुकरमध्ये असलेले पाणी उकळलेले आहे की नाही. त्यानंतर कुकरची शिट्टी आणि रिंग काढून टाका. - केक 20 मिनिटांपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या. गॅस बंद केल्यानंतर टूथपिकच्या मदतीने केक पूर्णपणे शिजला आहे की नाही याची खात्री करून घ्या. केक तयार झाल्यानंतर कुकरमध्येच थंड होऊ द्या.
- थंड झाल्यानंतर केक चाकूच्या मदतीने कापून घ्या.
- रवा केक खाण्यासाठी तयार आहे.